‘पुक्टो’च्या वतीने महाविद्यालयात ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 09:16 PM2017-08-24T21:16:24+5:302017-08-24T21:20:41+5:30
अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात देशभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळा दिवस पाळला
नाशिक : अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात देशभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळा दिवस पाळला. त्यास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या निर्णयानुसार पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व महाविद्यालयांत मंगळवारी काळा दिवस साजरा करण्यात आला.
सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याबाबत या आधी दिल्ली व मुंबई येथे आंदोलने करण्यात आली, परंतु सरकार निर्णय घेत नाही. सातवा आयोग देत असताना वाढीव खर्चापोटी पाच वर्षे सर्व राज्यांना मदत केंद्र सरकारने करावी व उच्च शिक्षण क्षेत्रांत सातवा वेतन आयोग एकाच वेळेस व सुरळीतपणे लागू व्हावा यासाठी आखिल भारतीय प्राध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व प्राध्यापकांनी सरकारच्या विरोधात काळी फित लावून निषेध व्यक्त केला.
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, ‘यूजीसी’ने काढलेली अधिसूचना रद्द करणे, बढतीसाठी आवश्यक असलेले रिफ्रेशर व ओरियेंटेशन कोर्सला मुदत वाढ द्यावी, सहायक प्राध्यापकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, उच्चशिक्षणबाबत धोरण ठरविताना व शिक्षण विषयक निर्णय घेताना प्राध्यापक महासंघाच्या प्रतिनिधींना सोबत घ्यावे, एपीआय रद्द करावा, शिक्षणाचे बाजारीकरण व खासगीकरण रोखावे, प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, चाइस बेस क्रे डिट सिस्टीम बंद करावी आदि मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार वरिष्ठ महाविद्यालयात काळा दिवस पाळण्यात आला.