मराठा आंदोलनात काळ्या रंगाची वेशभूषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:23+5:302021-06-16T04:20:23+5:30
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे, या भूमिकेवर ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पर्याय शोधून मराठा समाजाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे, या भूमिकेवर समाज ठाम असून, या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हाती घेतले आहे. या आंदोलनाचे रणशिंग कोल्हापूरच्या ऐतिहासिक स्थळावरून बुधवारी (दि.१६) फुंकले जात असून, या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना काळ्या रंगाची वेशभूषा करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांसह विविध मराठा संघटना प्रतिनिधींनी मंगळवारी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, कोल्हापुरनंतर दुसरे आंदोलन नाशकात गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात मैदानावर सोमवारी (दि. २१) सकाळी १० ते १ या वेळेत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नाशिकसह अन्य जिल्ह्यामधूनही या आंदोलनाची मशाल धगधगणार आहे. त्यानंतर पुणे ते मुंबई विधान भवन लॉंग मार्चसंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका पार पडणार असून, सकल मराठा समाजाने पुकारलेल्या या आंदोलनाचा परिणाम साधला जावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या जबाबदारीचे वर्गीकरण करून ती प्रामाणिकपणे पार पाडून मराठा समाजाला न्याय देण्याची नीतिमत्ता सिध्द करावी असे आवाहन आंदोलानाच्या नेतृत्वातून केले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (रिव्ह्यू पीटिशन) दाखल करावी. तसेच मराठा आरक्षणातून शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्त्या द्याव्यात, ओबीसींच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू कराव्यात, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनेही आपले मराठा समाजाविषयी असलेले दायित्व मान्य करावे, न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याने प्रक्रिया हाती घेत केंद्राकडे अहवाल पाठवावा, असे आवाहन आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
यावेळी करण गायकर, गणेश कदम, राजू देसले, शिवा तेलंग, उमेश शिंदे, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, सचिन पवार, शिवाजी मोरे, योगेश गांगुर्डे, शरद शिंदे आदी उपस्थित होते.
इन्फो-
आंदोलनात काळी वेशभूषा
संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलनाचे दुसरे पर्व राजर्षी शाहू समाधिस्थळ कोल्हापूर येथून प्रारंभ होत आहे, त्याची आचारसंहिताही जाहीर करण्यात आली असून, काळ्या रंगाची वेषभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून, काळा मास्क वापरण्याच्या सूचना समन्वयकांकडून करण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन स्थळावर नो मास्क नो एन्ट्री उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे निश्चित आचारसंहितेनुसारच गणवेश परिधान करूनच मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, सॅनिटायझर सोबत ठेवून त्याचा वापर करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.