काळ्या कोटावर झळकली ‘लालफित’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 05:07 PM2019-11-06T17:07:39+5:302019-11-06T17:09:58+5:30
जिल्हा न्यायालयाच्या जुन्या बार लायब्ररीच्या जवळ वकिलांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरूष वकील उपस्थित होते.
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात जिल्हाभरातील वकिलांनी एकत्र येत राज्याच्या बार कौन्सिलच्या पत्रानुसार आपल्या काळ्या रंगाच्या कोटावर ‘लालफित’ लावून नवी दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा बुधवारी (दि.६) सकाळी निषेध नोंदविला.
दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून वकिलांवर करण्यात आलेल्या गोळीबार व मारहाणीची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलनेही या घटनेची निंदा करत राज्यभरातील वकिल संघटनांना पत्र पाठवून लालफित लावून कामकाज करण्याचे आवाहन केले. यानुसार नाशिक वकील संघाने बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील वकिलवर्गाने बुधवारी न्यायालयात एकत्र येत आपल्या काळ्या कोटाच्या बाहीवर लाल रंगाची फीत लावून निषेध नोंदविला. दिवसभर वकिलांनी अशाचपध्दतीने विविध खटल्यांमध्ये युक्तीवाद केला. जिल्हा न्यायालयाच्या जुन्या बार लायब्ररीच्या जवळ वकिलांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरूष वकील उपस्थित होते. नाशिक बार कौन्सिलचे अॅड. नितीन ठाकरे, अॅड. जयंत जायभावे, अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांसह आदि वकील उपस्थित होते. यावेळी जायभावे म्हणाले, पोलीस आणि वकिलांमध्ये पार्किंगच्या विषयावरून वाद होतात. पोलिसांकडून अशाप्रकारे हल्ले यापुढे झाल्यास वकीलवर्गदेखील संघटितपणे कायदेशीर उत्तर दिले जाईल. दिल्लीत घडलेली घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. कोणीही कायदा हातात घेत आपले काम केले तर ते योग्य होणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्यानेच शिक्षा दिली जाईल.