काळा पैसा पांढरा करण्याचा अड्डा

By Admin | Published: July 30, 2015 03:21 AM2015-07-30T03:21:40+5:302015-07-30T03:21:40+5:30

शिर्डीतील साई संस्थानला परदेशातून मिळणाऱ्या देणग्या म्हणजे काळा पैसा असून, शिर्डी संस्थान ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा अड्डा असल्याचा सनसनाटी आरोप

Black money | काळा पैसा पांढरा करण्याचा अड्डा

काळा पैसा पांढरा करण्याचा अड्डा

googlenewsNext

नाशिक : शिर्डीतील साई संस्थानला परदेशातून मिळणाऱ्या देणग्या म्हणजे काळा पैसा असून, शिर्डी संस्थान ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा अड्डा असल्याचा सनसनाटी आरोप द्वारकाशारदा पीठाधिश्वर शंकराचार्य श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
स्वरूपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साई संस्थानला ‘टार्गेट’ केले. त्यांनी याआधीही साईबाबांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याचे शिर्डीसह राज्य व देशभरात पडसाद उमटले होते.
महाराष्ट्र शासनाने राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू केला आहे; मात्र त्याची शिर्डीत अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. साईबाबा हे दैवी रूप नाही. त्यांचे देशासाठी व समाजासाठी काय योगदान आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या चमत्काराबाबत अंधश्रद्धेविरोधातील कोणीच कसे बोलत नाहीत. संस्थानच्या नावाखाली भाविकांची लूटमार केली जात आहे. सिंहस्थासाठी शिर्डी संस्थानने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्यावर बोलताना संस्थानने त्यांचाच पैसा खर्च करावा, असे ते म्हणाले.
देशभरात मुस्लिमांसाठी मदरसे आहेत. ख्रिश्चनांसाठी चर्च आहेत; मात्र हिंदू मुलांनी धर्माचे शिक्षण कोठे घ्यायचे, असा सवाल त्यांनी केला. गोमाता वाचविणे काळाची गरज असून, शासनाने संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी करावी. गोदावरी नदीच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्याचा अध्यात्म तसेच शरीरावरदेखील परिणाम होतो, असेही स्वरूपानंद सरस्वती म्हणाले. (प्रतिनिधी)

आखाडा परिषदेचा वाद
त्र्यंबकेश्वरचे नरेंद्रगिरी आखाडा परिषदेचे अध्यक्ष असल्याचे ते म्हणाले. महंत ग्यानदास पूर्वी अध्यक्ष होते. आता ते अध्यक्ष नाहीत, असे सांगत त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे. ग्यानदास चुकीची माहिती देत असल्याचा दावाही त्यांनी केला.

कठोर कारवाई गरजेची
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनवर कठोर कारवाई व्हावी. तो देशद्रोही असून, त्याच्या कृत्याचा धर्माशी संबंध नाही. त्याच्यावर कारवाई केल्यास समाजात चांगला संदेश जाईल, असे सांगून फाशीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली.

Web Title: Black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.