महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा
By संजय पाठक | Published: June 7, 2024 09:01 AM2024-06-07T09:01:44+5:302024-06-07T09:02:42+5:30
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही.
संजय पाठक, नाशिक- लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीच आपले काम केले असा आरोप केला असून अप्रत्यक्षरीत्या छगन भुजबळ यांच्याकडे निर्देश केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी आरोपांचे खंडन केले असून भुजबळ यांनी सर्वाधिक आघाडीवर राहून काम केले असे म्हटले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. सुमारे 18 दिवसांचा कालावधी गेल्यानंतर भुजबळ यांनी आपण उमेदवारी स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न केले होते. दरम्यान, हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाली आणि त्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुमारे एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे नाराज झालेल्या हेमंत गोडसे यांनी घटक पक्षातील सर्व पक्षांनी काम केले.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही नेत्यांनीच काम केले असा आरोप केला छगन भुजबळ यांनी निवडणुकीत काम केले नाही काय या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कोणी काम केले नाही हे सर्वांनाच माहिती आहे असे सूचक विधान केले. त्यावर प्रतिज्ञा देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया ही पराभवाने झालेल्या नैराश्येतून आली आहे असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीत सर्वाधिक काम केले आहे. छगन भुजबळ हे भर उन्हात गोडसे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी रॅली सहभागी झाले होते या उलट महायुतीचे नेते हे ऐनवेळी हजेरी लावून पुन्हा निघून गेले होते असे त्यांनी सांगितले. हेमंत गोडसे विधान चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.