गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांना बडतर्फीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:23 AM2018-07-10T01:23:18+5:302018-07-10T01:23:48+5:30
महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण विभागाने सोमवारी (दि.९) बजावल्या आहेत. शिक्षण विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण विभागाने सोमवारी (दि.९) बजावल्या आहेत. शिक्षण विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आणखी तीन शिक्षकांची चौकशी अजूनही सुरू असून त्याबाबतदेखील लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिका शाळांमधील या शिक्षकांना गेल्या दोन ते तीन वर्षांत निलंबित करण्यात आले होते. मात्र चौकशी अधिकारी नसल्याने त्यांच्या चौकशी रखडल्या होत्या. मात्र मध्यंतरी बाबूराव हांगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर त्याचा अहवाल महिनभरातच प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने अंतिम कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने नोटीस बजावलेल्या आडगाव येथील मनपा शाळेतील शिक्षक मुरलीधर भोर यांच्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप आहे. ज्ञानदेव पगार या सातपूर येथील शिक्षकाने अनेक नागरिकांना कर्ज काढून देतो तसेच स्कीममध्ये गुंतवणूक करणे यासारखी कामे करतानाच बॅँकांचे बनावट शिक्के तयार करून वापरल्याचा ठपका आहे. लता महारू गरु ड या रजेवर असतानादेखील हजेरी पटावर स्वाक्षरी करत, वेतन काढून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हिरामण बागुल यांना कळवण येथील अफरातफर प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात त्यांना तीन दिवस कारागृहात काढावे लागले होते. शैला मानकर यांच्यावर दाखल्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अनेक शिक्षकांवर आरोप शिक्षण विभागाच्या तीन शिक्षकांवरदेखील विविध आरोप असल्याने सध्या ते निलंबित असून, त्यांची चाकैशी सुरू आहे. यात मुख्याध्यापक जयश्री पंगुळवाडे यांनी बीएची बोगस पदवी सादर केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. विजय भोसले यांच्यावर शिष्यवृत्तीच्या रकमेचा अपहार, तर छाया गोसावी यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी लाच घेतल्याची तक्र ार आहे.