नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट, स्फोटामागे संशयाचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 09:22 AM2017-10-07T09:22:28+5:302017-10-07T11:44:40+5:30

नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी पहाचे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. 

Blast in Tibetan market of Nashik | नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट, स्फोटामागे संशयाचा धूर

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट, स्फोटामागे संशयाचा धूर

googlenewsNext

नाशिक - नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला हा स्फोट प्रथमदर्शनी अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ज्या गाळ्यात हा स्फोट झाला तिथे सिलिंडर आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्फोट झाल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळेपर्यंत एक तासाचा अवधी लोटला होता. ज्या गाळ्यात स्फोट झाला त्याचा मालक हा सिन्नर येथे राहणारा असून आजूबाजूच्या लोकांनी व कामगारांनी सर्वप्रथम त्याला घटनेची माहिती कळवली, अशी माहिती समोर आली आहे. पण स्फोटानंतर तब्बल तासाभराने पोलिसांना माहिती मिळाली. यामुळे घटनेमागील संशय अधिक वाढला आहे.

दरम्यान, या स्फोटामुळे 9 दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील अनेक इमारतींना हादरा बसला व खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. घटनास्थळी पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्यासहीत बॉम्ब शोधक-नाशक पथक दाखल झाले.  तसंच हा स्फोट कसा झाला याचा शोध घेण्यासाठी फॉरेंन्सिक लॅबचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

5 दिवसांपूर्वी सापडले होते 17 डिटोनेटर्स व 60 जिलेटीनच्या काड्या
दरम्यान, स्फोट झाला त्या ठिकाणाजवळच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय तसेच काही अंतरावरच जुने पोलीस आयुक्तालय आहे. पाच दिवसांपूर्वीच वडाळा पाथर्डी रोडवर 60 जिलेटीनच्या काड्या आणि 17 डिटोनेटर्स सापडले होते. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही .

गुन्हेगारीमध्ये वाढ 
नाशिक शहरातील मध्यवर्ती भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे गुन्हेगारी वाढली आहे. मार्केटमधील एका गाळ्यात अमली पदार्थांचा साठा सापडला होता तसेच या मार्केटमध्ये हत्या तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न असे अनेक गुन्हेही अलीकडेच घडले आहेत.

एक तासात नेमके काय घडले?

शरणपूर रोड परिसरात असलेल्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजता घडलेला स्फोट व त्याची तीव्रता बघता स्फोटक पदार्थ या ठिकाणी होते का? याबाबत पोलीस चाचपणी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा स्फोट पहाटे 5 वाजता घडला मात्र पोलिसांना घटनेची माहिती एक तास उशीरा कळवण्यात आली. हा एक तासाचा कालावधी आहे, तो पोलिसांसह सर्वांना चक्रव्यूहात टाकणारा आहे.  कारण पोलीस तपास यंत्रणा अद्याप स्फोटाची धागेदोरे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र हाती अपयश आले आहे. या एक तासाच्या कालावधीत नेमके काय घडले आता या दिशेने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.  
त्या एक तासांत दुकान मालकाच्या सांगण्यावरून काही पुरावे लपवले गेले का? हे देखील पोलीस पडताळून पाहत आहेत. एकूणच 5 तास उलटूनही अद्याप पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक अशी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत असून स्फोट नेमका कशाचा झाला? या शोध घेतला जात आहे. 5 तास उलटले असूनही अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे मिळाले नाही. स्फोट व त्यामागील गूढ कायम आहे. त्या एक तासात काय घडले ? हाच मोठा प्रश्न तपास यंत्राणांपुढे निर्माण झाला आहे.

 

Web Title: Blast in Tibetan market of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.