अंध दाम्पत्यांचा विवाह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:26 PM2019-07-08T16:26:58+5:302019-07-08T16:27:19+5:30
‘मुद्रा’चा पुढाकार : संसारोपयोगी साहित्य भेट
नाशिक - द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन आणि मराठा मुद्रा महिला मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दोन दाम्पत्यांचा विवाह सोहळा लावून देण्यात आला. तसेच, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट सुकर व्हावी, या हेतूने ६० विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्रीकृष्ण लॉन्समध्ये आयोजित या अभिनव सोहळ्याला आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांसह उद्योजक अजित बने, हिरामण आहेर, नगरसेविका स्वाती भामरे, ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष अरु ण भारस्कर आदींच्या हस्ते कार्यक्र माचा शुभारंभ झाला. यावेळी नवदांपत्यांना मान्यवरांनी शुभेच्छा देताना आमदार प्रा. फरांदे म्हणाल्या की, दृष्टीहिनांनादेखील सामाजिक कार्याची चांगली दृष्टी असते, हे या उपक्र मातून दिसले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी पाच टक्के निधी राखीव असतो. त्याचा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी उपयोग केला जातो आहे. त्यासाठी नावनोंदणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिभा होळकर यांनी सामाजिक ऋणानुबंधातून हा उपक्र म घेतल्याचे सांगितले. सोहळ्यात वेदमंत्रांच्या घोषात सोनाली सुरासे आणि राजेंद्र पाटील तसेच अब्दुल दस्तगीर शेख - नजीर शेख यांचा विवाह उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. मुद्रा मराठा मंडळाने या नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्याचीही भेट दिली. कार्यक्र माला कल्पना पांडे, शालिनी पिंगळे, प्रतिभा पाटील, कुंदा भालेराव, मनिषा पाटील, विजया बोराडे, शिल्पा गायकवाड, विजया पाटील, वैशाली आहेर आदी उपस्थित होत्या.
मनपातर्फे प्रशिक्षण केंद्र
महापालिका आयुक्त गमे यांनी महापालिकेच्या वतीने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, हा या केंद्राच्या उभारणीमागील प्रमुख हेतू आहे. राखीव पाच टक्के निधीतून दिव्यांगांसाठी संगणक प्रशिक्षण, वाचनालयासारखे उपक्र म राबविण्याची गरज आहे. त्यासाठी ब्लाइंड वेल्फेअरसारख्या संस्थांनी प्रस्ताव दिल्यास त्याचा निश्चित विचार होईल, अशी ग्वाहीदेखील पालिका आयुक्तांनी दिली.