जनावर चोरीच्या घटनांमुळे मालेगावी पाेलिसांची १३ ठिकाणी नाकाबंदी
By Suyog.joshi | Published: June 19, 2023 02:25 PM2023-06-19T14:25:29+5:302023-06-19T14:26:35+5:30
कत्तलीच्या हेतूने जनावरांची चाेरटी वाहतूक राेखणार
मालेगाव: आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात १३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदी ठिकाणी पाेलिसांचा सशस्त्र बंदाेबस्त तैनात केला आहे. येत्या २९ जून राेजी बकरी ईदचा सण साजरा हाेणार आहे. ईदला जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. राज्यात गाेवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. शहरात गाेवंश जनावरांची हत्या हाेऊ नये यादृष्टीने पाेलिसांनी कारवाया सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बाहेरहून हाेणारी जनावरांची चाेरटी वाहतूक राेखण्यासाठी शहराला जाेडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर १३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी स्थळी दोन अधिकारी व सहा कर्मचारी तैनात केले आहेत. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. चाेवीस तास नाकाबंदी असल्याने जनावरांच्या चाेरट्या वाहतुकीला आळा बसणार आहे. नाकाबंदी ईदनंतर ही काही दिवस कायम ठेवली जाणार आहे. आठवडे बाजारातील जनावरांच्या खरेदी - विक्रीवर संबंधित क्षेत्रातील प्रभारी अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी नाकाबंदी
दरेगाव चाैफुली, ओवाडी नाला, देवरे वस्ती, चंदनपुरी गेट, मनमाड चाैफुली, टेहरे चाैफुली, झाेडगे फाटा, कळवाडी फाटा, साैंदाणे (देवळा फाटा), निमगाव (नांदगाव राेड) , करंजगव्हाण (कुसुम्बा राेड), गवती बंगला, वडनेर खाकुर्डी (नामपूर राेड).
नाकाबंदी ठिकाणी वरिष्ठ अधिकारी अचानक भेटी देऊन पहाणी करतील. जनावरांची चाेरटी वाहतूक आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. एक गाे स्काॅड तयार करून शहरांतर्गत हाेणारी जनावरांची वाहतूक व कत्तल राेखली जात आहे. -अनिकेत भारती, अपर पाेलिस अधीक्षक, मालेगाव