नांदगाव सब-वेची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:20+5:302021-09-03T04:15:20+5:30
नांदगाव : शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सब-वे मधील अनेक उणिवा आता हळूहळू समोर येत आहेत. ...
नांदगाव : शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सब-वे मधील अनेक उणिवा आता हळूहळू समोर येत आहेत. पावसाळा नसताना झिरपणाऱ्या पाण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेल्या या सब-वेमध्ये सध्या पावसाळ्याच्या पाण्याचे मोठे नळ सुरू झाले असून, उपसा करणाऱ्या मोटारीची मर्यादा त्यातून उघडी पडली आहे. आता सब-वे मधून प्रवेश करताना व बाहेर पाडण्यासाठी वाहनधारकांना विविध कसरती करीत मार्ग काढावे लागत आहे, हे कमी काय म्हणून आता सब-वेच्या मोकळ्या जागांचा ताबा छोट्या छोट्या व्यावसायिकांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
पूर्वीच्या रेल्वे फाटकाला बंद करण्यात आल्याने त्याठिकाणी जुन्या जागेवर टपरीधारकांनी आपले बस्तान थाटले आहे. अशातच सब-वे च्या रस्त्यावर देखील जमिनीवर पथारी मारून व्यवसाय सुरू झाल्याने वाहनधारकांना आपली वाहने काढताना खोळंबून पडावे लागत आहे. सब-वेची अशी नाकाबंदी होत असताना अनेक दुचाकीस्वारांना सब-वेच्या मोकळ्या जागेत पार्किंग करण्याचा मोह आवरता येत नाही. परिणामी सब-वे असून अडचण, नसून खोळंबा या धर्तीचा बनला आहे. राजकीय पातळीवर श्रेयबाजी करणाऱ्यांपैकी अद्याप तरी स्थानिक सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते. दुसरीकडे शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस, पालिका या यंत्रणांनाही दखल घ्यावीशी वाटले नाही. अगोदरच आरेखनात अरुंद झालेला रस्ता अधिक संकोचला गेल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्येत अजून वेगळी भर पडली आहे.
फोटो- ०२ नांदगाव सबवे
020921\02nsk_45_02092021_13.jpg
फोटो- ०२ नांदगाव सबवे