जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:52 PM2020-03-25T22:52:12+5:302020-03-25T22:52:47+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १४ एप्रिलपर्यंत तब्बल २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर बुधवारी (दि. २५) जिल्ह्यात सर्वत्र रस्ते निर्मनुष्य झाले तर एरव्ही ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजारपेठाही ओस पडल्या.

Blockade of places in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा कमालीचा धसका ग्रामस्थांनी घेतला असून, आदिवासी पाड्यांवर रस्त्यावर लाकडाचे ओंडके टाकून प्रवेश बंद केला जात आहे.

Next
ठळक मुद्देकोरोनाची धास्ती : लॉकडाउनमुळे बाजारपेठा ओस; बाहेरच्या नागरिकांना गावबंदी

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १४ एप्रिलपर्यंत तब्बल २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर बुधवारी (दि. २५) जिल्ह्यात सर्वत्र रस्ते निर्मनुष्य झाले तर एरव्ही ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजारपेठाही ओस पडल्या. दरम्यान, दि. २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. गावोगावी, खेडोपाडीही ग्रामस्थांनी या कोरोनाचा धसका घेतला असून, बाहेरून येणाºया नागरिकांना गावात प्रवेशबंदी केली जात आहे. त्यासाठी कुठे रस्ते काटे, दगड, लाकडांचे ओंडके टाकून बंद केले जात आहेत तर कुठे बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांना सक्तीने शटर्स डाउन करण्यास सांगून कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले जात आहे.
चांदोरी येथे चेकपोस्ट
चांदोरी : परजिल्ह्यातून नाशिकमध्ये येणाºया प्रवाशांची कोरोना संशयित म्हणून तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ४७ ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले असून, त्यातील एक चांदोरी - सायखेडा त्रिफुली येथे चेक पोस्ट लावण्यात आला आहे. त्यात वाहतूक शाखेचे पोलीस, स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग व गाडी नंबर व गाडीत किती माणसे यांची नोंद करण्यासाठी शिक्षक तैनात करण्यात आले आहेत. या चेक पोस्टला बुधवारी (दि.२५) तहसीलदार दीपक पाटील यांनी भेट दिली. यावेळी शेजवळ, प्रदीप पालवे, पोलीस हवालदार नवनाथ नाईकवाडे, ग्रामविकास अधिकारी संजय मते, आदी कर्मचारी सह दत्ता गडाख, संजय दाते उपस्थित होते. दरम्यान, प्रत्येकी आठ तासाला नवीन कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. दरम्यान, सायखेडा पोलीस ठाणे व ग्रामपालिकामार्फत नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांचे पीक !
पेठ : एकीकडे कोरोनासारख्या जागतिक महामारीवर उपाययोजना व बचाव करण्यासाठी शासन व प्रशासन अथक प्रयत्न करत असताना दुसरीकडे समाजकंटकांकडून समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असून, पोलीस व महसूल प्रशासनाने अशावर करडी नजर ठेवली आहे.
मंगळवारी मध्यरात्री पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यातील काही गावातील लोकांना नातेवाइकांचे भ्रमणध्वनी आले. रात्री कोणीही झोपू नये नाही तर मोठा अनर्थ घडणार असल्याची अफवा रात्रीच्या काळोखात ही झपाट्याने सर्वत्र पसरली. झोपलेले नागरिक जागे झाले. सर्वत्र फोनाफोनी सुरू झाली. अनेकांनी एवढ्या रात्री सरकारी व पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून खात्री करण्याचा प्रयत्न केला. पहाटेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक समूहावर याबाबत चर्चांना उधाण आले होते. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना नागरिकांनी बळी न पडता संयमाने घरातच थांबावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी ही गावागावत लोकांना धीर देत घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. संकटाच्या काळात अफवा पसरवणाºया समाजकंटकाविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कुठे काटे तर कोठे दगड...
पेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या खेड्यापर्यंत येऊन पोहोचू नये यासाठी पेठ तालुक्यात प्रत्येक गाव बंदिस्त केले जात असून, कोठे काटेरी कुंपण तर कोठे दगड, लाकडे टाकून बाहेरून येणारे वाहने व नागरिकांना मज्जाव केला जात आहे. पेठ तालुक्यात जवळपास २०२ गावे असून, कोरोनाचा गावकºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. शहरात लोकांना घरी बसवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागत असताना वाडी वस्तीवर मात्र स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले आहे. ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांचे मार्फत गावाच्या वेशी बंद करण्यात आल्या असून, पंचाच्या परवानगीशिवाय कोणालाही गावाबाहेर सोडले जात नाही.
४ नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू होताच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परजिल्ह्यातून येणारी वाहने, नागरिकांची तपासणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व निमोणनाका फाट्यावर नाकेबंदी करण्यात आली आहे. नाशिक-पुणे व नाशिक-अहमदनगर या दोन्हीही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
४ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक जिल्ह्याची सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पोलिसांनी रस्ता बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणाºया वाहनांना तपासून सोडण्याची कारवाई केली. दुधाचे टँकर, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे टँकर, फळे, भाज्या वाहतुकीची वाहने, रु ग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाºया वाहनांना सवलत देण्यात आली आहे
४ नाशिक जिल्ह्यात पुणे, अहमदनगर, शिर्डी, अकोला, कोपरगाव, लोणी, राहाता आदी राज्यमार्ग जिल्ह्यात येतात. त्यामुळे या सर्व ठिकाणी पोलीस प्रशासनाने नाकाबंदी केली आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवरील कºहे घाटाजवळ नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी एक पोलीस आधिकारी व चार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
४ नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावरील निमोण नाका येथे नाकाबंदी असून, या ठिकाणी तीन कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून सिन्नर शहराकडे येणाºया वाहनांना सोनेवाडी येथील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रस्त्यावर लाकडे आडवे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे.
वावी ग्रामपालिकेने बनविली नियमावली
सिन्नर : तालुक्यातील वावी ग्रामपंचायतीने गावासाठी नियमावली तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ध्वनिक्षेपकावर सूचना करून गावात कोरोना विषाणू चा संसर्ग न होऊ देण्याचा संकल्प गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केला. सरपंच नंदा गावडे, उपसरपंच सतीश भुतडा, माजी उपसरपंच विजय काटे यांच्यासह कोरोना विरु द्ध दक्षता समितीने दुकानदार व ग्रामस्थांसाठी नियमावली लागू केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी बंदी लागू करावी लागली. रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी जागोजोगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पोलीस प्रशासनावर ताण येऊ नये यासाठी ग्रामपंचायत ने नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नियम लागू केले आहे.

Web Title: Blockade of places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.