बिटको रूग्णालयात होणार साडेतीन कोटींची रक्तपेढी

By Sandeep.bhalerao | Published: October 16, 2023 07:11 PM2023-10-16T19:11:50+5:302023-10-16T19:12:10+5:30

वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती : रक्त संक्रमण विज्ञान कार्यशाळा

blood bank of 3 5 crores will be held in bitco hospital | बिटको रूग्णालयात होणार साडेतीन कोटींची रक्तपेढी

बिटको रूग्णालयात होणार साडेतीन कोटींची रक्तपेढी

संदीप भालेराव, नाशिक : महानगरपालिकेचे बाळासाहेब ठाकरे बिटको रूग्णालय येथे रक्तपेढीसाठी साडेतीन कोटींची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असून लवकरच या रूग्णालयात अत्याधुनिक रक्तपेढीची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांनी दिली.

ऐच्छिक रक्तदान मास - ऑक्टोबर २०२३ निमित्त शासकीय रक्तपेढी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, मेट्रो रक्तपेढी, शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रक्त संक्रमण विज्ञान विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेस डॉ.निलेश वासेकर, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. प्रितेश जुनागडे, डॉ. राजेश कुचेरीया व डॉ. पुरुषोत्तम पुरी हे विषयतज्ञ सहभागी झाले होते. कार्यशाळेस महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनच्या दोन क्रेडिट पॉइंटस् ची मान्यता देण्यात आली होती. शहरातील एकूण १२५ डॉक्टरांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

यावेळी डॉ. चव्हाण यांनी अशा कार्यशाळा वेळोवेळी आयोजित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. रक्तसंक्रमण विज्ञान या विषयातील अत्याधुनिक ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टर, विषयतज्ञ तसेच तांत्रिक कर्मचारी यांनी विशेष रुची दाखविल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कौतुक केले.

विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पुरी यांचे ‘मिशन ब्लड: नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ या विषयावर सादरीकरण झाले. लावणी, पोवाडे, अभंग या माध्यमातून मनोरंजन करतानाच त्यांनी “ कथा रक्ताची, व्यथा दानाची “ या विषयावर माहिती उपस्थितांना दिली. प्रास्ताविक डॉ. विशाल गुंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. माधवी गोरे मुठाळ यांनी केले.

Web Title: blood bank of 3 5 crores will be held in bitco hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.