रक्ताचेही गोठले नाते, स्मशानभूमीत साचलेली राख नदीपात्रात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:54+5:302021-05-27T04:14:54+5:30
नाशिक शहरात १९ स्मशानभूमी असून, त्यात ५५ बेडस् आहेत. गेल्या वर्षी कोरेानाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला ज्या रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू ...
नाशिक शहरात १९ स्मशानभूमी असून, त्यात ५५ बेडस् आहेत. गेल्या वर्षी कोरेानाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला ज्या रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाले, त्यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, मृतांची संख्या वाढली. त्या तुलनेत महापालिकेच्या नाशिक अमरधामध्ये एक विद्युत आणि एक गॅस शवदाहिनी असल्याने त्यावरील ताण वाढत होता. मात्र, मागील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अमरधाममध्येही वेटिंग वाढल्याने महापालिकेने सर्व पारंपरिक स्मशानभूमी खुल्या केल्या. अर्थात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यामुळे संसर्ग वाढीची शक्यता कैकपटीने अधिक असल्याने अनेकदा रुग्णांचे नातेवाईक अगदी राख सावडायलाही आले नसल्याचे प्रकारदेखील घडले. नाशिक आणि पंचवटी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राख आणि अन्य साहित्य थेट गोदार्पण करण्यासाठी थेट पाइपलाइन टाकण्यात आली आहे, तर दुसरीकडे अन्य स्मशानभूमीत पाण्याचा बंब आणून अथवा नजीकच्या नदीपात्रातून पाणी आणून अथवा नळाने स्मशानभूमी धुऊन राख नदीपात्रात सेाडली जाते. मोरवाडीसारख्या एखाद्या स्मशानभूमीचा विषयच फक्त अडचणीचा आहे; परंतु तेथे राखेतून चीज वस्तू शोधणारा पारंपरिक समाज त्याचा वापर करतो आणि उर्वरित राख नदीपात्रात टाकली जाते.
इन्फो...
अस्थी विसर्जन होते; पण...
-अमरधाममध्ये अंत्यसंस्कारानंतर रुग्णांचे नातेवाईक अस्थी घेऊन जातात आणि त्याचे विधिवत विसर्जनदेखील करतात. अर्थात विसर्जनानंतर तत्काळ तीन ते चार तासांत राख सावडण्यासाठी बोलावले जाते.
- अंत्यसंस्कारानंतर अस्थी घेण्यासाठी नातेवाईक येतात; परंतु शास्त्रापुरते अस्थी घेऊन जातात. उर्वरित राखमिश्रित अस्थी नदीपात्रात प्रवाही केल्या जातात.
- काही वेळा अस्थी घेण्यासाठीसुद्धा नागरिक येत नाहीत. अशावेळी मात्र राखेबरोबरच अस्थींचीदेखील विल्हेवाट लावली जाते. म्हणजेच ते गोदार्पण होते.
इन्फो..१
मोरवाडी स्मशानभूमी
सिडको विभागातील मोरवाडी स्मशानभूमी बऱ्यापैकी मध्यवर्ती आहे. या स्मशानभूमीत चार बेड आहेत. सध्या कोरोना काळात ताण असल्याने अंत्यसंस्कारांनंतर चार ते पाच तासांनी नातेवाइकांना बोलावले जाते. त्यानंतर बेडवरील राख काढून बाजूला ठेवली जाते, तसेच बेड स्वच्छ करून मग त्यावर नव्याने दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी केली जाते. अर्थात, याठिकाणी थेट पाइपलाइन नाही किंवा नदीपात्र जवळ नसल्याने राख गाडीतून नेऊन जाऊन नदीपात्रात टाकली जाते.
इन्फो..२
उंटवाडी स्मशानभूमी
यापूर्वी सिडकोतील उंटवाडी किंवा अंबड येथील स्मशानभूमीचा फार वापर नागरिक करीत नव्हते. नाशिक अमरधामवरच अधिक भर होता. मात्र, कोराेनाकाळात काेविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी उंटवाडी स्मशानभूमीचा वापर होतो. नासर्डी नदी किनारी असलेल्या या स्मशानभूमीत बेडखाली पाइपलाइन नाही. त्यामुळे राख सावडल्यानंतर उर्वरित राख थेट नदीपात्रात जाते. त्यासाठी पाण्याने बेड धुऊन घेतले जातात.
इन्फो..३
आनंदवली स्मशानभूमी
सातपूर विभागात पिंपळगाव बहुला आणि आनंदवली स्मशानभूमी सध्या वापरात आहेत. शहरातील नाशिक, तसेच पंचवटी अमरधाम येथील ताणाच्या तुलनेत या स्मशानभूमीवर ताण कमी असला तरी याठिकाणी राखेचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचे कारण म्हणजे दोन्ही स्मशानभूमी नदीकाठी असल्याने अडचण नाही. अंत्यसंस्कारानंतर सर्व राख नदीपात्रातच जाते.
कोट...
मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था आहे. अंत्यसंस्कारानंतर राख सावडण्यासाठी मृत व्यक्तीचे नातेवाईक येऊन जातात. त्यानंतर उरलेली राख साचून ठेवली जाते आणि नंतर मोटारीने ही राख नदीपात्रात नेऊ टाकली जाते. नातेवाइकांच्या भावनांचा विचार करून यासंदर्भात काळजी घेतली जाते.
- सय्यद मणियार, मोरवाडी स्मशानभूमी
कोट...
उंटवाडी स्मशानभूमीत आता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणले जातात. नासर्डी नदीपात्रालगत स्मशानभूमी असल्याने अडचण येत नाही. स्मशानाचे बेड धुऊन उरलेली सर्व राख नदीपात्रात टाकली जाते.
- दीपक वाघमारे, उंटवाडी स्मशानभूमी
कोट...
सातपूर आणि पिंपळगाव बहुला येथील स्मशानभूमीतील राख नासर्डी नदीपात्रात, तर आनंदवली स्मशानभूमीतील राख गोदावरी नदीपात्रात सोडली जाते. सातपूर स्मशानभूमीत पाइपलाइन आहे, त्यामुळे पाइपलाइनद्वारे राख नदीपात्रात जाते, तर उर्वरित ठिकाणी बादल्या भरून पाणी आणि राख नदीपात्रात टाकली जाते.
- रिजवान खान, सातपूर