ठक्कर बझारजवळ एकाचा निर्घृण खून
By admin | Published: September 16, 2015 11:53 PM2015-09-16T23:53:22+5:302015-09-16T23:54:17+5:30
गँगवार : अर्थकारणाची पार्श्वभूमी; संशयित ताब्यात
नाशिक : ठक्कर बझारजवळील हॉटेल तुळजा येथे मंगळवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने दुसऱ्या टोळक्यावर केलेल्या हल्ल्यात राहुल ऊर्फ गुणाजी गणपत जाधव (३६, रा. रामवाडी) यांची हत्त्या झाली असून, उर्वरित चौघे जखमी झाले आहेत़ त्यातील किशोर नागरे या युवकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी हिरालाल ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार संशयित परेश मोरे व जखमी किशोर नागरे यांच्यात आर्थिक कारणावरून मंगळवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास वाद झाला होता. हा वाद आपसात मिटविण्यासाठी राहुल जाधव व त्याच्या साथीदारांनी मध्यस्थी केली़ त्यानंतर गुणाजी जाधव, किशोर नागरे (२८, रामवाडी, पंचवटी), हिरालाल कृष्णा ठोंबरे (३५, रामवाडी, पंचवटी), किरण कुलकर्णी, सागर परदेशी, विकी दिवे हे भोजनासाठी ठक्कर बझारजवळील हॉटेल तुळजा येथे गेले होते़ हे सर्व हॉटेल तुळजामध्ये गेल्याची माहिती मिळाल्याने संशयित परेश मोरे हा भाऊ व्यंकटेश मोरे व साथीदारांसह तिथे आला़
याठिकाणी परेश मोरे व किशोर नागरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला़ यावेळी तिथे असलेले व्यंकटेश मोरे, परेश मोरे व त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने नागरे, जाधव, ठोंबरे, परदेशी यांच्या वार केले़ त्यामध्ये गुणाजी जाधवच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर नागरे, ठोंबरे व परदेशी जखमी झाले़ त्यातील नागरेची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेनंतर संशयित फरार झाले़
या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच जाधवचा मृत्यू झाला होता. मयत गुणाजी जाधवच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हिरालाल ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित व्यंकटेश मोरे, परेश मोरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी यातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे़