गणेशगाव येथील तरुणीचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:19 AM2018-03-25T01:19:55+5:302018-03-25T01:19:55+5:30
तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना चंदर महाले असे मृत तरुणीचे नाव असून, ती आई सोबत गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील विनायकनगर शिवारात शेतात राहात होती. मयत रंजनाच्या विवाहासंदर्भात शनिवारी पाहुण्यांच्या घरी जायच असल्यामुळे तिची आई शुक्रवारी सायंकाळच्या वेळी गावातील भाऊबंदांना निमंत्रण देण्यासाठी गेली होती, तर मोठी बहीण मजुरीला गेली होती. रात्री ७.३० वाजेदरम्यान रंजना घरात एकटीच होती. ती स्वयंपाकाची तयारी करत होती याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. तिच्याशी झटापट झाली असल्याच्या खुणा दिसत होत्या. प्रतिकार वाढत असल्याने गुन्हेगाराने रंजनाला घराबाहेर ओढत नेले. रंजना मदतीसाठी आवाज देत असताना गुन्हेगाराने नांगरासाठी वापरल्या जाणाऱ्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यात व तोंडावर जोरदार प्रहार केला. त्यातच तिचा जीव गेल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर आली आहे. घटनेनंतर अज्ञात मारेकºयाने घटनास्थळापासून पोबारा केला. घरी आल्यानंतर तिच्या आईने तिला हाक मारली; मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आईने बॅटरी घेऊन घराच्या आसपास शोध घेतला त्यांना घराच्या समोरच खळ्यावर रंजनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. आईने मोठ्याने हंबरडा फोडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ त्र्यंबकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी रात्री १ वाजता अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविकांत सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आदी करत आहेत.
मोलमजुरी करून निर्वाह
रंजनाच्या पश्चात आई व तीन बहिणी असा परिवार आहे. वडिलांचे छत्र नसल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आई ताईबाई चंदर महाले यांच्यावर येऊन पडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी मोठ्या मुलीने व रंजनाने आपल्या खांद्यावर घेऊन दोघी बहिणी मोलमजुरी करण्यासाठी विनायकनगरहून गिरणारे येथे जात असत.