आढावा बैठकीत शहरातील बीएलओंची झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:37 AM2018-09-18T01:37:15+5:302018-09-18T01:37:45+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चांगलीच झाडाझडती झाली.
नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चांगलीच झाडाझडती झाली. प्रकृतीची कारणे, मोकाट कुत्र्यांचा त्रास आदी कारणे दाखवून काम नाकारणाºया बीएलओंना येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्याबरोबरच कारवाईचा इशाराही देण्यात आला. मध्य मतदारसंघातील बीएलओंशी यावेळी व्यक्तिगत माहिती जाणून घेण्यात आली. त्यासाठी बीएलओंना केंद्र क्रमांकानुसार एकाच वेळी न बोलविता, टप्प्याटप्प्यात बैठकीसाठी पाचारण करून प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेताना रंगीत छायाचित्रे किती जमा केली. नवीन मतदार किती नोंदविले, मयत व दुबार मतदारांची किती नावे वगळली याची पुराव्यानिशी माहिती घेण्यात आली. त्यात अनेक बीएलओंनी शून्य टक्के काम केल्याचे यावेळी उघडकीस आल्यावर त्याबाबत जाब विचारला असता, बीएलओंकडून विविध कारणे पुढे करण्यात आली. काहींनी प्रकृती बरी नसल्याचे सांगितले तर काहींनी शाळेतून वेळच मिळत नसल्याची तक्रार केली. मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासाठी मतदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे व घरांचे दरवाजे उघडत नसल्याचे कारणही अनेकांनी दिले. लहान मुले असल्यामुळे जाता येत नाही, विशिष्ट भागात मोकाट कुत्रे अधिक असल्याने त्यांच्या त्रासामुळे काम करता आले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही बीएलओंनी पुरेसे मानधनच मिळाले नसल्याची तक्रारही केली. तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी याबाबत तक्रारी जाणून घेत त्यावर उताराही सांगितल्यामुळे अनेक बीएलओंना माना खाली घालाव्या लागल्या. यावेळी प्रत्येक बीएलओंना त्यांनी करावयाच्या कामकाजाचा तक्ताच तयार करून देण्यात आला व येत्या ३० सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिवसभर चाललेल्या या बैठकीसाठी सर्वच बीएलओंनी हजेरी लावली.
२० टक्के बीएलओंना नोटिसा
रविवारी मतदार पुनरीक्षण संदर्भात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. बीएलओंनी मतदान केंद्रावर दिवसभर उपस्थित राहणे अनिवार्य असताना तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत नाशिक मध्य मतदारसंघातील जवळपास २० टक्के बीएलओ यावेळी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.