महिला सदस्यांना धक्काबुक्की
By admin | Published: April 6, 2017 01:31 AM2017-04-06T01:31:48+5:302017-04-06T01:32:01+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत कॉँग्रेसच्या उपाध्यक्ष नयना गावित व अश्विनी अहेर यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गावित यांनी केला आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत कॉँग्रेसच्या फुटीर सदस्यांना व्हीप बजावण्यासाठी गेलेल्या कॉँग्रेसच्या उपाध्यक्ष नयना गावित व सदस्य अश्विनी अहेर यांना सभागृहात भाजपा व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप नयना गावित यांनी केला आहे.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनीही महिला सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना सभागृहात झालेली धक्काबुक्की निषेधार्ह असून, याबाबत पोलिसांकडे या प्रकाराविरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही भाजपा-राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून असा प्रकार झाल्याचे म्हटले आहे. दुपारी दोन तास व्हीप बजावण्यासाठी आक्रमक असलेल्या उपाध्यक्ष नयना गावित व गटनेते यशवंत गवळी, सदस्य अश्विनी अहेर यांनी सभात्याग केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. सभागृहात आम्ही कॉँग्रेसचे बंडखोर सदस्य अशोक टोंगारे, शोभा कडाळे व सुनीता चारोस्कर यांना व्हीप बजावण्यासाठी गेलो असता राष्ट्रवादीचे सदस्य हिरामण खोसकर तसेच भाजपाच्या सदस्यांनी अरेरावी करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. आम्ही केवळ व्हीप बजावण्यासाठी आग्रही असताना आम्हाला उद्धट भाषा करीत भाजपा-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी रोखले. धक्काबुक्की केल्याचा आरोप उपाध्यक्ष नयना गावित यांनी केला.