उन्हाचा तडा तडाखा : उच्चांकी तपमान ३९.२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:36 AM2018-04-03T01:36:08+5:302018-04-03T01:36:08+5:30
नाशिककरांना यंदा एप्रिल महिन्यात प्रखर उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याची चिन्हे आहे. एप्रिलच्या दुसऱ्याच दिवशी हंगामातील उच्चांकी ३९.२ अंशांपर्यंत कमाल तपमानाचा पारा पोहचला. गतवर्षी २ एप्रिलला अवघे ३५.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.
नाशिक : नाशिककरांना यंदा एप्रिल महिन्यात प्रखर उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याची चिन्हे आहे. एप्रिलच्या दुसऱ्याच दिवशी हंगामातील उच्चांकी ३९.२ अंशांपर्यंत कमाल तपमानाचा पारा पोहचला. गतवर्षी २ एप्रिलला अवघे ३५.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शहराच्या कमाल तपमानात कमालीची वाढ होत असल्याने नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत आहे. मागील तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा नाशिककर अनुभवत असून उष्णतेची लाट वाढणार असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झाले आहे. शक्यतो दुपारी बारा ते पाच या वेळेत गरज असेल तर उन्हापासून बचावाच्या सर्व उपाययोजना करूनच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच नाशिककरांना बालकांची विशेष काळजी या मौसमात घ्यावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तपमानाचा पारा चाळिशी पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतर कमाल तपमान ३९ अंशांपर्यंत पोहचले होते; मात्र यंदा दुसºयाच दिवशी कमाल तपमान ३९ अंशांच्या पुढे गेल्याने या आठवड्यात पारा चाळिशीपर्यंत पोहचण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या वर्षी १२ ते १९ एप्रिल हा आठवडा सर्वाधिक उष्ण राहिला होता. या आठवड्यात तपमान चाळिशीच्या पुढे सरकले होते आणि गेल्यावर्षी १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिनी ४१.१ अंश इतका उच्चांक नोंदविला गेला होता.
उकाड्याने घामाघूम
नाशिककर सध्या उन्हाच्या प्रखर झळांनी हैराण झाले आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रांचा वापरही नागरिकांकडून वाढला आहे. मात्र वातानुकूलित यंत्रांचा वाढता वापर तपमानातील उष्मा वाढविण्यासाठी हातभार लावत आहे. नागरिकांनी वाहने, घरे, कार्यालयांमध्ये गरजेपेक्षा अधिक वातानुकूलित यंत्रांचा वापर क रणे टाळणे गरजेचे आहे.