विजयी जल्लोषात भगव्यापासून निळा झेंडा दूरच
By admin | Published: May 17, 2014 12:01 AM2014-05-17T00:01:45+5:302014-05-17T00:16:36+5:30
नाशिक : शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भगवे झेंडे फडकले आणि गुलालाची उधळण झाली. मात्र महायुतीत असूनही, रिपाइंचा झेंडा बाहेर पडला नाही. विजयी जल्लोषात शिवसेनेचे कार्यकर्ते गुलालाने माखले, भगवे ध्वज खांद्यावर मिरवले. त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंचा निळा झेंडा आणि नीळ उडालीच नाही. शिवसेना कार्यालयाबाहेर एकमेव निळा झेंडा फडकला तेवढाच काय तो अपवाद.

रिपाइंचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले महायुतीतून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले; मात्र रिपाइंचे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते महायुतीत कितपत रमले हा विषय तेव्हाही चर्चेत राहिला आणि आजही त्याची प्रचितीच आली. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत असे रिपाइंच्या वतीने वारंवार सांगण्यात आले; मात्र स्थानिक पातळीवर प्रचाराच्या बाबतीत रिपाइंने नेहमीच सावधानतेची भूमिका घेतल्याचे लपून राहिले नाही. त्यातच रिपाइंच्या जिल्हा नेत्यांनी ठामपणे शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याचे टाळल्याने शिवसेनेनेदेखील काहीशी नाराजीच दर्शविली होती. त्यामुळे महायुतीत असूनही रिपाइं-सेना यांचे मनोमीलन फारसे अनुभवास आले नाही. विजयी जल्लोषातही आज तोच अनुभव आला. निकाल स्पष्ट होत असताना मतमोजणी कार्यालयाबाहेर सेनेचे कार्यकर्ते भगवे झेंडे आणि गुलालाची उधळण करीत होते. निकाल दृष्टीपथात येताच सेनेचे नेते मतमोजणी केंद्रावर आले; मात्र त्यात रिपाइं नेत्यांचा समावेश नव्हता. मतमोजणी कक्षाबाहेर रस्ते गुलालाने माखले, त्यात नीळ मात्र दिसून आली नाही. शिवसेना कार्यालयाबाहेर रिपाइंचा फलक आणि झेंडा हाच एकमेव अपवाद ठरला. देवळाली कॅम्पमध्ये मात्र रिपाइंच्या नेत्यांनी हेमंत गोडसे यांच्या विजयाचे पेढे वाटून स्वागत केले.