भाजपा आमदाराला महापालिकेचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:14 AM2017-09-27T00:14:13+5:302017-09-27T00:14:19+5:30
शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची सुचविलेली जागा देण्यास मनपा महासभेने नकार देत वसंत गिते समर्थक नगरसेवकांच्या उपसूचनेवरून टाकळीरोड येथील जागेचा ठराव मंजूर केला आहे.
नाशिक : शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची सुचविलेली जागा देण्यास मनपा महासभेने नकार देत वसंत गिते समर्थक नगरसेवकांच्या उपसूचनेवरून टाकळीरोड येथील जागेचा ठराव मंजूर केला आहे. सदरचा ठराव प्रशासनाने शासनाकडे रवानाही केला आहे. स्त्री रुग्णालयाच्या जागेच्या वादात वसंत गिते वरचढ ठरल्याने भाजपात फरांदे-गिते यांच्यातील संघर्ष यापुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाची फरपट सुरूच आहे. शासनाने शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेकडे जागा मागितली आहे. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे या पाठपुरावा करत आहेत. सर्वप्रथम संदर्भ रुग्णालयाच्या जागेत सदर स्त्री रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, सदर जागा ही अपुरी असल्याने व त्याठिकाणी अन्य रुग्णांचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयासाठी वडाळा शिवारातील जागा प्रस्तावित करण्यात आली. परंतु, मागील पंचवार्षिक काळात स्थानिक नगरसेवक संजय चव्हाण यांनी त्यास हरकत घेतली आणि सदर जागेत अगोदरच रुग्णालय उभारणीचे नियोजन असताना पुन्हा स्त्री रुग्णालयाचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे मनसेच्या काळात सदरचा प्रस्ताव फेटाळला होता. आता महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा जागा बदल करत भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहा जवळील जागा रुग्णालयासाठी प्रस्तावित करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्तावही महासभेवर ठेवण्यात आला. परंतु, स्थानिक नगरसेवक व वसंत गिते समर्थक अर्चना जाधव यांनी सदरचा प्रस्ताव तूर्त बाजूला ठेवण्याची विनंती केली होती. दरम्यान, त्यावर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी उपसूचना देत गायकवाड सभागृहाच्या जागेत वाहनतळ असल्याने सदर जागेऐवजी टाकळीरोड याठिकाणची जागा प्रस्तावित केली. महासभेने आजी-माजी आमदारांच्या या संघर्षात वसंत गिते यांच्या बाजूने कौल देत टाकळीरोडची जागा स्त्री रुग्णालयासाठी मंजूर केली आणि तसा ठराव प्रशासनाला पाठविला. प्रशासनानेही सदरचा ठराव शासनाला रवाना केला आहे. त्यामुळे, स्त्री रुग्णालयाच्या या जागेच्या वादात वसंत गिते यांची सरशी झाल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि गिते यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
आयुक्तांकडून जागांची पाहणी
महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि. २५) स्त्री रुग्णालयासाठी प्रस्तावित केलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहालगत आणि टाकळरोड येथील जागांची पाहणी केली. महासभेने केलेला टाकळीरोडचा ठराव प्रशासनाने शासनाला पाठविला असल्याची माहिती आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, भाजपा आमदाराचाच प्रस्ताव महासभेने ठोकरून लावल्याने फरांदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहणार आहे.