आठ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह, मालेगावातील घटना; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:27 PM2024-05-15T16:27:04+5:302024-05-15T16:27:19+5:30
मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संशयिताचा शोध घेण्याची मागणी करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
चंद्रकांत सोनार
मालेगाव : आजीच्या घरातून मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संशयिताचा शोध घेण्याची मागणी करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, बालिकाचा मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाळेला सुट्या असल्याने आठ वर्षीय बालिका आपल्या आजीकडे राहायला आली होती. मंगळवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास आजी परिसरात पुरणाच्या पोळ्या लाटण्यासाठी गेली होती. काही वेळानंतर त्या घरी आल्या असता घरात चिमुकली आढळून आली नाही. बालिका बेपत्ता झाल्याने नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनीही तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही.
बुधवारी सकाळच्या सुमारास बालिकेचा मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेने सारेच हादरले. कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत नातेवाईक आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संशयिताला ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांनी मागणी केली. सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर पोलिसांना नागरिकांना समजावण्यात यश आले.
दरम्यान, मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यानंतर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.