भोजापूर धरणात आढळला संगमनेरच्या तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:02 AM2020-08-29T00:02:29+5:302020-08-29T00:14:26+5:30
सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर माधव सोनवणे (३०, रा. कसारा-दुमाला, अकोलेरोड, संगमनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भोजापूर धरणाच्या पाण्यात म्हाळुंगी नदीत गुरुवारी (दि. २७) रात्री ७ वाजेच्या सुुमारास मृतदेह वाहून येत असल्याचे चापडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. याबाबत वावी पोलिसांना माहिती देण्यात आली.
तथापि रात्रीच्यावेळी या परिसरात पोहोचणे शक्य नसल्याने शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलिसांनी धरणाच्या परिसरात पोहोचले. तोपर्यंत मृतदेह धरणातील मनेगावसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसपर्यंत तरंगत आला होता.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घातपात असल्याचा संशय
पोलिसांनी सदरचा मृतदेह बाहेर काढला असता त्याचे दोन्ही हात दोरीने बांधलेले आढळून आले. त्यामुळे घातपात असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे यांनी अकोले, संगमनेर व सिन्नर पोलीस ठाण्यात संपर्क साधून मिसिंग तक्रारींबद्दल विचारणा केली. मृताच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून तो संगमनेर येथील ज्ञानेश्वर माधव सोनवणे असल्याचे समजले.