समाजकार्यासाठी देह झिजवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:35 PM2020-01-17T22:35:18+5:302020-01-18T01:11:01+5:30
ज्ञानोबा - तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भारतासारख्या विचारसंपन्न देशात जन्माला आलो हेच आपले भाग्य आहे. त्यामुळे आपला देह समाजकार्यासाठी झिजवावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षक अधिकारी गणेश कानवडे यांनी केले.
सिन्नर : ज्ञानोबा - तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भारतासारख्या विचारसंपन्न देशात जन्माला आलो हेच आपले भाग्य आहे. त्यामुळे आपला देह समाजकार्यासाठी झिजवावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षक अधिकारी गणेश कानवडे यांनी केले.
येथील उडान फाउण्डेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कानवडे बोलत होते. फाउण्डेशनचे अध्यक्ष भरत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर साक्रीचे गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, देवनदी खोरे पतसंस्थेचे अध्यक्ष केरू पवार, संचालक बी.एम.
पवार उपस्थित होते. उडान फाउण्डेशनच्या वतीने शौर्य गाजवलेल्यांचा बालशौर्य पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
तुमचा एखादा निश्चय आणि ध्येय जर पक्के असेल तर कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकता, असे निर्मळ यांनी सांगितले. प्रास्ताविकात ‘उडान’चे अध्यक्ष शिंदे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रपतींकडून बालशौर्य पुरस्कार दिला जातो. परंतु राष्ट्रपती पुरस्कारासाठी ग्रामीण भागातील मुलांना माहिती मिळणे व प्रस्ताव पाठविणे सहज शक्य होत नाही म्हणून ग्रामीण भागातील आणि मुलांच्या शौर्याचा गौरव व्हावा म्हणून फाउण्डेशनने बालशौर्य पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतातून परतत असताना २२ ते २५ महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्यानंतर त्यात असलेली निकिता सोनवणे, अंजनगाव (ता. मालेगाव) हिने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पोहत जाऊन पाच ते सात महिलांचा जीव वाचवला. या कार्याबद्दल फाउण्डेशनच्या वतीने तिला कानवडे यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला.