बारी घाटात आढळला महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:37 AM2018-08-14T01:37:39+5:302018-08-14T01:37:56+5:30
नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील बारी घाटात निर्जनस्थळी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या महिलेचा अपघात, की घातपात याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घोटी : नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील बारी घाटात निर्जनस्थळी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या महिलेचा अपघात, की घातपात याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारी घाटात निर्जनस्थळी एक मृतदेह पडला असून, या मृतदेहाची परिसरात दुर्गंधी पसरली असल्याची माहिती वासाळीचे सरपंच काशीनाथ कोरडे यांनी घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना दूरध्वनीवरून कळविली. या बाबीची खातरजमा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह कर्मचारी शीतल गायकवाड, संतोष दोंदे, प्रकाश कासार, धुमसे आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, एका पस्तीसवर्षीय महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह एका कपारीलगत पडलेला आढळला. या मृतदेहाशेजारी जेवणाचा रिकामा डब्बा, ओढणी आणि प्लॅस्टिकचे कापड व तपकीर आदी साहित्य पोलिसांना मिळून आले. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, ३५ वर्षीय सदर महिलेच्या डाव्या हातावर तुळशीचे चित्र गोंदलेले असून, या महिलेबाबत माहीत असल्यास घोटी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी घोटी ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, सदर महिला डोंगरावरून घसरून पडली, की हत्या करून तिचा मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आला. याबाबत पोलीस तपास करत आहेत.