बोगस डॉक्टरांनी ठोकले टाळे
By admin | Published: March 21, 2017 12:12 AM2017-03-21T00:12:20+5:302017-03-21T00:12:41+5:30
तपासणी मोहिमेचा धसका : मनपा मात्र कारवाईवर ठाम
नाशिक : महापालिकेने शहरातील रुग्णालये, क्लिनिक, दवाखाने तसेच सोनोग्राफी-गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केल्याने त्याचा धसका तथाकथित बोगस डॉक्टरांनी घेतला असून, अनेकांनी कारवाईच्या भीतीपोटी दवाखान्यांना टाळे ठोकत पलायन केले आहे. मात्र, महापालिकेने १५ एप्रिलनंतर संशयित बोगस डॉक्टरांविरुद्ध अचानक धडक मोहीम राबविण्याचे ठरविले असल्याने बोगस डॉक्टरांची पळताभुई थोडी होणार आहे.
महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार दि. १५ एप्रिलपासून शहरातील रुग्णालये, दवाखाने तसेच सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रुग्णालयांचे नोंदणी प्रमाणपत्र, बाह्यरुग्ण रजिस्टरसह डॉक्टरांचे प्रमाणपत्र आदिंची तपासणी केली जात आहे. तपासणीत अनेक रुग्णालयांनी नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणच केले नसल्याचे आढळून आले आहे. महापालिकेमार्फत सदर मोहीम राबविली जात असल्याने त्याचा धसका गल्लीबोळात दवाखाने थाटलेल्या तथाकथित बोगस डॉक्टरांनी घेतला आहे. या तपासणी मोहिमेमुळे अनेकांनी आपल्या दवाखान्यांना टाळे ठोकले असून, काहींनी तर बाहेर लावण्यात आलेले नामफलकही काढून ठेवले आहेत. मात्र, महापालिकेमार्फत सदर दवाखान्यांची तीनदा जाऊन तपासणी केली जाणार असून, महिनाभरात सदर दवाखाने बंद आढळून आल्यास त्यांची तपासणी १५ एप्रिलनंतर कधीही केव्हाही केली जाणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत ८७ क्लिनिक, ५७ रुग्णालये यांची तपासणी केली असून, २६ सोनोग्राफी सेंटर आणि १८ गर्भपात केंद्रांचीही तपासणी केली आहे. या तपासणीत उल्लंघन झाल्याचे आढळून आले नसल्याचे डॉ. डेकाटे यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)