गिरणारे परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:41 AM2018-05-01T00:41:28+5:302018-05-01T00:41:28+5:30
गेल्या चार-पाच वर्षांपासून गिरणारे परिसरातील खेड्यापाड्यांत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे.
गिरणारे : गेल्या चार-पाच वर्षांपासून गिरणारे परिसरातील खेड्यापाड्यांत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. गिरणारे परिसर पूर्णत: आदिवासी बहुल भाग असल्याने ना कोणती पदवी ना कुठली शाश्वती काही बोगस डॉक्टर ४-५ वर्षांपासून लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी स्थानिक व आदिवासी भागातील भोळ्याभाबड्या आदिवासी समाजाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जीविताशीही खेळ चालविला जात आहे. अधिक रकमेच्या औषधी जास्त व सलाइन देऊन आदिवासींची फसवणूक करून हे लोक आपला खिसा भरत आहेत. या बिनडिग्री बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे कधी कधी रुग्णांना नाशिक येथे हलविण्याशिवाय पर्याय नसतो. यंदाच्या उन्हाळ्यात अधिकच तपमान वाढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अतिसार, ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारखे आजार दिसू लागले आहेत. काही भागांतील आदिवासींना दवाखान्यात येण्यासाठी हरसूल, त्र्यंबकेश्वर व गिरणारे लांब पडत असल्याने व कधी कधी वाहतूक सुविधा, आर्थिक परिस्थितीमुळे ते शहरात येण्याचे टाळतात. परिणामी याचा फायदा या डॉक्टरांना होतो. ही लोकं जवळच्याच बोगस डॉक्टरकडून उपचार करून घेतात. परंतु या डॉक्टरांकडे कोणत्याच प्रकारची पदवी (डिग्री) किंवा उपचाराचे शास्त्रीय प्रशिक्षण नसतानाही ते सलाइन आणि जड इंजेक्शनचा वापर करून रु ग्णांची फसवणूक करीत आहे.
अद्याप कारवाई नाही
या अगोदर याबाबत काही खेड्यातील नागरिकांनी अनेक तक्र ार केल्या. मात्र बोगस डॉक्टरवर थातूरमातूर कार्यवाही झाली. त्यांनी आपला बोगस व्यवसाय आजपर्यंत चालूच ठेवला आहे. यावर कुठे तरी अंकुश लावणे गरजेचे आहे. गिरणारे परिसरातील वाघेरा, वेळे, देवरगाव, रोहिला, हिरडी तसेच इतर गावांनाही याचा विळखा आहे. नागरिकांनी याविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे.