राष्टवादीला मतदान करण्यासाठी युतीच्या नावाने बोगस मेसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:56 AM2019-04-28T00:56:24+5:302019-04-28T00:57:41+5:30
लोकसभा निवडणुकीत जाहीर प्रचार संपताच छुपा प्रचार सुरू होत असल्याने रात्र वैऱ्याची मानली जाते. नाशिकमध्ये याच धर्तीवर प्रकार सुरू झाल्याची तक्रार युतीने केली असून, राष्टवादीच्या उमेदवाराला मते देण्यासाठी चक्क आमदार राजाभाऊ वाजे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह अन्य मान्यवरांच्या नावाने बल्क मेसेज मतदारांच्या मोबाइलमध्ये धडकले आहेत.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत जाहीर प्रचार संपताच छुपा प्रचार सुरू होत असल्याने रात्र वैऱ्याची मानली जाते. नाशिकमध्ये याच धर्तीवर प्रकार सुरू झाल्याची तक्रार युतीने केली असून, राष्टवादीच्या उमेदवाराला मते देण्यासाठी चक्क आमदार राजाभाऊ वाजे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह अन्य मान्यवरांच्या नावाने बल्क मेसेज मतदारांच्या मोबाइलमध्ये धडकले आहेत. यासंदर्भात आमदार वाजे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे, तर अजय बोरस्ते यांच्यासह शहरातील अन्य नेत्यांनी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२९) मतदान होणार आहे. त्यासाठी जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (दि.२७) सायंकाळी झाली. तोपर्यंत नागरिकांना युती आणि आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे मेसेज येतच होते; परंतु रात्री मात्र भलताच प्रकार घडला. सिन्नर तालुक्यात नागरिकांना आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असे मेसेज पाठविण्यात आले. त्या खाली शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे यांची नावे होती. नाशिक शहरात अशाच प्रकारे आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी भाजप आमदार सीमा हिरे तसेच शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या नावाने तर रात्री आमदार देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्या नावाने असे मेसेज मोबाइलवर पाठविण्यात आले. याप्रकाराने खळबळ उडाली. संबंधितांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी याची चौकशी करून कारवाई सुरू केली.
यासंदर्भात, आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना पत्र दिले असून, त्यात आपण राष्टÑवादीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे कोणतेही आवाहन केले नसतानाही निवडणूक काळात अफवा पसरविण्याचे काम विरोधक करीत आहेत. हा प्रकार गंभीर असून, आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. तरी या प्रकरणात अफवांवर आळा घालण्यासाठी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असे पत्रात म्हटले आहे. बोरस्ते आणि अन्य नेत्यांनी नाशिक शहरातील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.