बोगस कामांचे होणार लेखापरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:46 AM2018-09-06T00:46:23+5:302018-09-06T00:46:28+5:30
मालेगाव : महापालिका हद्दीत सर्वसाधारण निधीतील ३४ कोटी रुपये खर्चाच्या एक हजार ५६६ कामांची धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या पथकाकडून तपासणी व लेखापरीक्षण केले जाणार आहे. या पथकाच्या अहवालानंतरच देयके अदा केले जाणार असल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात विविध प्रभागांमध्ये गेल्या आर्थिक वर्षातील सर्वसाधारण निधीतून बोगस विकासकामे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ३४ कोटी रुपये खर्चाच्या संशयास्पद एक हजार ५६६ कामांची चौकशी महापालिकेने स्थानिक यंत्रणेकडून सुरू केली होती; मात्र मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांनी त्रयस्थ यंत्रणेकडून या कामांची तपासणी व चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी महापालिका प्रशासनाला त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या पथकाला लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे. पथकाच्या अहवालानंतरच सादर झालेल्या देयके अदा करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सदर पथक कामाची सद्यस्थिती, मंजुरी आदेश, गुणवत्ता व दर्जाची तपासणी करणार आहे. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांच्या देयकांमध्ये कपात केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.