रुग्ण विलगीकरणावरून प्रांतवादाला उकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:26 PM2020-05-08T22:26:20+5:302020-05-09T00:05:22+5:30

मालेगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांसह इतरांवर नाशिक येथे उपचार करू नये, या नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेचे मालेगाव येथे तीव्र पडसाद उमटले असून, शुक्रवारी (दि. ८) डॉ. शिशिर हिरे, प्रा. के. एन. आहिरे, निखिल पवार, देवा पाटील आदींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फिजिकल डिस्टन्स पाळून आंदोलन केले. याशिवाय अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांची भेट घेऊन नाशिकच्या लोकप्रतिनिधींचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

 Boiling provincialism over patient isolation | रुग्ण विलगीकरणावरून प्रांतवादाला उकळी

रुग्ण विलगीकरणावरून प्रांतवादाला उकळी

Next

मालेगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांसह इतरांवर नाशिक येथे उपचार करू नये, या नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेचे मालेगाव येथे तीव्र पडसाद उमटले असून, शुक्रवारी (दि. ८) डॉ. शिशिर हिरे, प्रा. के. एन. आहिरे, निखिल पवार, देवा पाटील आदींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फिजिकल डिस्टन्स पाळून आंदोलन केले. याशिवाय अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांची भेट घेऊन नाशिकच्या लोकप्रतिनिधींचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी गुरुवारी (दि.७) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन मालेगावच्या रुग्णांवर नाशिकमध्ये उपचार करू नये अशी मागणी केली आहे. या मागणीचे तीव्र पडसाद सोशल माध्यमांवर उमटले. मालेगावी कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंत शहरात ४४१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, १८ जणांचा बळी गेला आहे. अशी भयावह परिस्थिती असताना नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी माणुसकीशून्य असल्याची भावना मालेगावकरांकडून व्यक्त होत आहे. शहरात कोरोनाबाधितांबरोबरच इतरही रुग्णांचे उपचार मिळविण्यासाठी हाल होत आहेत. वेळेत आणि योग्य उपचार मिळाले नाही तर सर्वसामान्य नागरिकांना प्राण गमाविण्याची वेळ येणार आहे, अशा परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित असताना आणि मानवी दृष्टिकोन ठेवून रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असताना केवळ मतदारसंघ आपल्या शहराच्या हिताचा विचार करणे हे स्वार्थीपणाचे लक्षण दिसून येत असल्याची टीका केली जात आहे.
दरम्यान, आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने अपर जिल्हाधिकारी निकम यांची भेट घेऊन नाशिकच्या लोकप्रतिनिधींचा निषेध केला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रुग्ण नाशिक येथे हलविण्यास होणाऱ्या विरोधाबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मालेगावात आरोग्य विषयक सोयीसुविधांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत काही रुग्णांवर नाशिक येथे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता, त्यास नाशिकचे महापौर यांच्यासह भाजपचे स्थानिक आमदार यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन विरोध दर्शविला आहे, हे निषेधार्ह आहे.
धुळ्यातील काही जणांनीही मालेगावचे रुग्ण उपचारासाठी धुळ्यात आणू नये, असा दुष्प्रचार समाजमाध्यमांवर चालविला आहे. नाशिक व धुळ्यातील ही मालेगावप्रतिची भावना कलूषित व एका विशिष्ट मानसिकतेचे द्योतक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यातूनच जनतेचा रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
----------
मग मालेगावकरांनी जायचे कोठे?
नाशिक हे जिल्ह्याचे ठिकाण असून, या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, एनडीएमव्हीपी व एसएमबीटी अशी दोन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्याप्रमाणात मालेगाव येथे सामान्य रुग्णालय सोडले तर आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे मालेगावच्या रुग्णांनी जायचे कोठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासनाने विकासाचा समतोल राखणे आवश्यक असून, नाशिकमधील बहुतांशी सुविधा शासकीय मदतीतून तयार झाल्या आहेत. समान न्याय वाटपाच्या तत्त्वाचा विचार करता मालेगाववर अन्याय झाला आहे. येथील बहुतांशी नागरिक अल्प उत्पन्न गटातील मोलमजुरी करणारे आहेत. आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालेगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशीही मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
----------
रुग्णांना गरजेनुसार उपचार मिळालेच पाहिजे. मालेगाव शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सक्षम आरोग्य दर्जाच्या उपचारासाठी प्रशासनाने नियोजन करावे.
- डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस
---------------
देश व राज्य संकटात असताना जबाबदार लोकप्रतिनिधींनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांच्या पदाला हे शोभत नाही. याउलट केंद्र व राज्य शासनाकडून त्यांनी आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- राजेंद्र भोसले, नेते, राष्ट्रवादी कॉँग्रेस
--------------------
आमदार-खासदारांना प्रांतवाद व सीमारेषेची भाषा शोभत नाही. आरोग्यसुविधा मिळविण्यासाठी रुग्णाला जगाच्या पाठीवर कुठेही नेता येते मग नाशिकला का नाही? संबंधितांची मागणी ही असंसदीय आहे. - आसिफ शेख, माजी आमदार, मालेगाव
-------------------
नाशिकच्या विकासात मालेगावचे मोठे योगदान आहे. कधीकाळी मालेगाव महापालिकेने नाशिक पालिकेला कर्ज दिले आहे. येथील लोकप्रतिनिधींनी विकासकामात मालेगाव नाशिक असा भेदभाव केला नाही. आपत्ती काळात प्रांतवाद करणे निषेधार्ह आहे.
- सखाराम घोडके, माजी उपमहापौर, मालेगाव

Web Title:  Boiling provincialism over patient isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक