कर्ज काढून खर्चाचा धाडसी अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:42+5:302021-02-06T04:24:42+5:30
नाशिक : गतवर्षात आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असताना केंद्र सरकारने तब्बल १५ लाख कोटींचे ...
नाशिक : गतवर्षात आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असताना केंद्र सरकारने तब्बल १५ लाख कोटींचे कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भांडवली व महसुली खर्च करणारा धाडसी अर्थसंकल्प सादर केल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता ३५ हजार कोटी आरोग्यसेवेवर खर्च करण्याची व परवडणाऱ्या घरांच्या योजनेला मुदतवाढ देण्याची तरतूद करून सर्वसामान्यांना दिलासाही दिल्याचे त्यांनी नमूद केले.
सावानातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुरुवारी (दि.४) ‘अर्थसंकल्प २०२१’ विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे विश्लेषण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, अर्थसचीव कुमार मुंगी, बी.जी वाघ, देवदत्त जोशी, प्रा. संगीता बाफना आदी उपस्थित होते. डॉ. विनायक गोविलकर म्हणाले, कोरोनामुळे केंद्र सरकारला मागील आर्थिक वर्षात अपेक्षित असलेल्या २०.२१ लाख कोटी महसुली उत्पनापैकी १५.५५ लाख कोटी म्हणजे जवळपास साडेचार लाख कोटी रुपयांचे उत्पन्न घटले आहे, तर ३०.४० लाख कोटींचा खर्च अपेक्षित असताना ३४.५० लाख कोटी खर्च झाल्याने साडेचार लाख कोटी अतिरिक्त खर्चाचा बोजा केंद्र सरकाच्या तिजोरीवर पडला. त्यामुळे सुमारे ९ लाख कोटींची वित्तीय तूट निर्माण झालेली असतानाच केंद्र सरकारने कोविडमधून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर योजनेसाठी २७ लाख कोटींचे पॅकज घोषित केले आहे. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि नागरिकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मांडला आहे. यातील ४३ टक्के खर्च कर्जातून केला जाणार असून त्यासाठी जवळपास १५ लाख कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. भानुदास शौचे यांनी केले.
महागाई वाढणार
उत्पनाचे स्त्रोत कमी असून, खर्च अधिक असलेला वित्तीय तुटीचा हा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी १५ लाख कोटी रुपये कर्ज घेणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर व्याजाच्या आणि कर्ज परतफेडीच्या रुपाने अतिरिक्त खर्चाचा ताण पडणार आहे. शिवाय पैशाला मागणी वाढून किंमत वाढणार असल्याने बँकांचे व्याजदर व महागाई वाढण्याची शक्यताही डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केली आहे.
(फोटो- नीलेश तांबे)