वीज वाहिनीचा धक्का लागून बोलठाणच्या जवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 02:54 AM2022-01-15T02:54:19+5:302022-01-15T02:54:49+5:30
देशाच्या नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) या जवानाचा उच्च विद्युत दाब असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी बिहार राज्यातील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे घडली. ११ केव्ही विद्युत दाब असलेल्या तारेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जवान अमोलच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली.
नांदगाव : देशाच्या नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) या जवानाचा उच्च विद्युत दाब असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी बिहार राज्यातील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे घडली. ११ केव्ही विद्युत दाब असलेल्या तारेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जवान अमोलच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर कार्यरत असलेला अमोल हा सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होता. या अपघातात अन्य दोन जवानांचा देखील मृत्यू झाल्याचे समजते. ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेला असताना केवळ जिद्द आणि चिकाटीमुळे अमोलची सहा वर्षापूवी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती. नुकताच दिवाळी सणात अमोल बोलठाण येथे सुटीवर आला होता. जाताना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता.
तारुण्यातच वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांच्या अधीन राहून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.