बॉम्बस्फोट तपासी अधिकारी ते सीबीआय संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 01:22 AM2021-05-28T01:22:24+5:302021-05-28T01:23:26+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा. या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुन्ह्यांचा जयसवाल यांनी कसोशीने तपास करत अनेक मासे गळाला लावले होते. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने भल्याभल्यांना धडकी भरविली होती. त्यांच्याकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
नाशिक : राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा. या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुन्ह्यांचा जयसवाल यांनी कसोशीने तपास करत अनेक मासे गळाला लावले होते. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने भल्याभल्यांना धडकी भरविली होती. त्यांच्याकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख असताना जयस्वाल यांनी नाशिकच्या मालेगाव मधील बॉम्बस्फोटाचा तपास केला होता.
तसेच मुंबईतील २००६ रेल्वे बॉम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच नेतृत्वात सुरू करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलीस सेवा बजावल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
२००८ साली केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या सुबोध कुमार यांना २०१८ साली पुन्हा एकदा महाराष्ट्रात बोलवण्यात आले. तेव्हा ते भारतीय गुप्तचर संस्थेच्या ( रॉ) अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ साली त्यांना पदोन्नती देऊन महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक पद सोपविण्यात आले होते. त्यानंतर आता थेट सीबीआय संचालकपदाची धुरा त्यांना देण्यात आली आहे. सीबीआयच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेणारे जयस्वाल हे महाराष्ट्र कॅडरचे दुसरे अधिकारी ठरले आहेत.
धडाकेबाज कामगिरीने चर्चेत
बहुचर्चित कोट्यावधी रुपयांचा तेलगी स्टँप पेपर घोटाळ्याच्या तपासी पथकाचे ही ते प्रमुख राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईने जयस्वाल चर्चेत राहिले होते. यावेळी त्यांनी पोलीस दलातील अनेक बड्या अधिकारीही आपल्या चौकशीच्या ‘रडार’वर घेतले होते. तसेच अनेक पोलिसांना अटकही केली होती.