बम बम भोले...चा गजर : दर्शनासाठी मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:04 AM2018-09-04T01:04:49+5:302018-09-04T01:05:36+5:30
श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पंचवटी : श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पहाटे मंदिरातील पुजारी यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाली. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तर दरवाजाने प्रवेश देण्यात येऊन दक्षिण दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. मालवीय चौक, रामकुंड परिसरात पूजा साहित्य तसेच बेल-फूल विक्र ी करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती. श्रावण सोमवारचे औचित्य साधून धार्मिक संस्था तसेच सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात होते. श्रावण मासातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी सकाळपासूनच मंदिराबाहेर रांगा लावलेल्या होत्या. पावसाने उघडीप दिली असल्याने दर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून आली. मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष केला.
सोमेश्वरला भाविकांना सुलभ दर्शन
चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त सोमेश्वरला भाविकांनी दर्शन घेतले. गोकुळ अष्ट्मी आणि श्रावण सोमवार असा दुहेरी योग जुळून आल्यामुळे सकाळच्या सत्रात भाविकांनी गर्दी केली परंतु सायंकाळी गर्दी कमी झाल्याने भाविकांना दर्शन सुलभ झाले. सकाळी नाशिक मनपाचे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागातून सोमेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून गर्दी झाली होती. मात्र नंतर हळूहळू गर्दी कमीकमी होत गेली. रविवारची सुट्टी असल्याने बरेचशे भाविक सोमेश्वरला भेट देऊन गेले असल्याने त्या तुलनेने सोमवारी भाविकांची गर्दी कमी दिसली. मंदिर संस्थांनच्या वतीने आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले होते, गंगापूर पोलीस यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी नगरसेवक विलास शिंदे, भीमराव पाटील, बाळासाहेब लांबे, राहुल बर्वे, अविनाश पाटील, देवेंद्र भुतडा, सतीश मुजूमदार, हरिश्चंद्र मोगल, गोकुल पाटील, बापू गायकर, श्याम परदेशी उपस्थित होते.