रस्त्यांसाठी काढणार कर्जरोखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:33 AM2020-05-30T00:33:31+5:302020-05-30T00:35:40+5:30
कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थितीत सापडलेल्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारे घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थितीत सापडलेल्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारे घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २९) झालेल्या सभेत महापौरांनी शहरातील डिपी आणि कॉलनी रस्त्यांच्या कामांसाठी कर्जरोखे काढण्याचा अथवा डिफर्ड पेमेंटचा पर्याय स्वीकारण्याचे जाहीर केले. याशिवाय ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर गोदा स्वच्छता अभियान राबवितानाच महत्त्वाकांक्षी फाळके स्मारकाचे पुनरुज्जीवन, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागोजागी स्क्रि निंग स्पॉट्स व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह विविध घोषणा महापौरांनी केले.
महापालिकेची महासभा मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी तयार केलेले २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक विद्यमान सभापती गणेश गिते यांनी महासभेत महापौर कुलकर्णी यांना प्रत्यक्ष सादर केले. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील त्रुटींवर बोट ठेवताना निधीचे समतोल वाटप करावे तसेच खेडे विकास निधी द्यावा, अशा प्रकारच्या सूचना पाच तास चाललेल्या अंदाजपत्रकीय चर्चेत नगरसेवकांनी सुचवल्या. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे हे जन्मशताद्बी वर्ष असल्याने फाळके स्मारक येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा करण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केला. शहरातील सर्व नैसर्गिक नाल्यांचे पाणी बारमाही वाहणार नाही यासाठी समांतर मलवाहिका टाकून ते पाणी मलनिस्सारण केंद्रांकडे वळविले जाईल. त्याचप्रमाणे भाजीमार्केट, बहुमजली वाहनतळ, सीएसआर निधीतून पर्यटन विकास, रोजगार निर्मितीसाठी आयटीपार्क व पंचवटीतील परशराम पुरिया पार्क येथे महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी ३७ पदाधिकारी व नगरसेवकांनी सहभाग घेतला. चर्चेअंति महापौर कुलकर्णी यांनी नगरसेवकांच्या उपसूचना व दुरुस्तीसह या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली जात असल्याचे जाहीर केले.
स्थायी समितीची शिफारस
आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फेब्रुवारी महिन्यात दोन हजार १६१ कोटी ७९ लाख रु पयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते, तर स्थायी समितीने जमा बाजूत २२८ कोटी ५५ लाखांची भार घातली होती. सदरचे २ हजार ३९० कोटी ४३ लाखांचे अंदाजपत्रक सादर करताना सभापतींनी दीडशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याची शिफारस केली.