तिच्या हातातील बेड्यांनी तोडले नात्याचे बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:41 AM2017-08-07T00:41:09+5:302017-08-07T00:41:17+5:30
तुम भी इस कच्चे धागे का मान रख लेना ! कम से कम राखी के दिन बहना का रस्ता तक लेना!!
भावाविषयीचे प्रेम आणि माहेरच्या आठवणीने आतुर झालेल्या बहिणीच्या मनाची अस्वस्थता एका शायरने या शायरीतून मांडली आहे. वर्षभर जरी भावाने पाठफिरविली असली तरी निदान रक्षाबंधनाला त्याने बहिणीची वाट पहावी अशी बहिणीची भाबडी अपेक्षा. बहीण-भावाचे हे ऋणानुबंध कदाचित जुळतीलही, परंतु कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बहिणींच्या साºया अपेक्षाच धुसर झाल्यात. त्यांची कुणी वाट पाहत नाही की कुणाचा हातही राखीसाठी पुढे होत नाही. कारागृह नशिबी आलेल्या अनेक महिला बंदी रक्षाबंधनाला या वेदना भोगतात. भाऊ त्यांना विसरले असले तरी त्या रक्षाबंधनाला घरी राखी पाठविण्यास विसरत नाहीत. परंतु त्यांच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी कोणताही भाऊराया कारागृहाकडे येत नाही हेही वास्तव विदारकच. कारागृहात असतानाही ती तिच्या भावाप्रतीचे प्रेम व्यक्त करीत रेशीम धागे माहेरी धाडत असते. परंतु तिच्या हातातील बेड्यांनी नात्यांचे बंध केव्हाच तोडून टाकले आहेत. म्हणूनच की काय धाडलेल्या राख्या पोहचल्या की नाही हेही तिला कळविले जात नाही. कारागृहातील काम म्हणून महिला कैदी राख्या बनवितात, परंतु त्या राख्या आपल्या भावाच्या मनगटावर बांधण्याचे भाग्य त्यांना अजूनही लाभलेले नाही. रक्षाबंधन सणाला कारागृहातील पुरुष कैद्यांसाठी असंख्य बहिणी तयार होतात.