ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉल्सचे२५ मार्चला लॉटरीने वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:54+5:302021-03-06T04:14:54+5:30
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनातून किमान ५ ते ६ कोटींची पुस्तकविक्री होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे. ...
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनातून किमान ५ ते ६ कोटींची पुस्तकविक्री होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे. त्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सना प्रकाशक आणि विक्रेत्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून १५ मार्चपर्यंत स्टॉल बुकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर २५ मार्चला स्टॉल्सचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
साहित्य संमेलनात अधिकाधिक स्टॉल्सची नोंदणी होऊन नागरिकांना लाखो पुस्तके एकाच ठिकाणी पहायला आणि विकत घ्यायला मिळावीत, यासाठी मोठ्या प्रमाणावर गाळ्यांची आखणी व रचना केलेली आहे. या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागात मिळून ८० प्रकाशक व पुस्तक विक्रेते यांनी मिळून १२१ गाळे आरक्षित केले आहेत. त्याखेरीज रोज या संदर्भात संमेलन कार्यालयात विचारणा होत आहे. साहित्य संमेलन नियोजित तारखेलाच करण्याच्या दृष्टीने ग्रंथ प्रदर्शन समितीचे काम सुरु आहे. ग्रंथ प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग केलेल्या नागरिकांना २५ मार्चला लॉटरी पद्धतीने या गाळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. एका व्यक्तीस , संस्थेस जास्तीत जास्त चारच गाळे मिळणार आहेत. तसेच गाळेधारकांसाठी मार्गदर्शक तत्वे व नियमही निश्चित केलेले आहेत. प्रदर्शनाच्या स्टॉल्सबाबत झालेल्या चर्चेमध्ये सी.एल. कुलकर्णी, नीलिमा अमृतकर, दीप्ती जोशी, विद्या जुन्नर मिलिंद बाबर, मुक्ता बालिगा, पंकज क्षेमकल्याणी, हेमंत देशमुख यांनी भाग घेतला होता. समिती प्रमुख वसंत खैरनार यांनी स्वागत केले व संमेलन कार्यालयाचे प्रमुख दिलीप साळवेकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान संमेलनातील दहा प्रकारच्या कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्याचे संमेलनाच्या निमंत्रकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.