रेडिरेकनर स्थिर राहिल्याने बांधकाम क्षेत्राला बूस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:27+5:302021-04-04T04:15:27+5:30

नाशिक : घरांचे बाजारपेठेतील विक्रीमूल्य ठरवणाऱ्या रेडिकरनरच्या दरांमध्ये यंदा कोणतीही वाढ होणार नसून, २०२१-२२ या वर्षासाठी २०२०-२१चेच दर कायम ...

Boost the construction sector as Redireckner remains stable | रेडिरेकनर स्थिर राहिल्याने बांधकाम क्षेत्राला बूस्ट

रेडिरेकनर स्थिर राहिल्याने बांधकाम क्षेत्राला बूस्ट

Next

नाशिक : घरांचे बाजारपेठेतील विक्रीमूल्य ठरवणाऱ्या रेडिकरनरच्या दरांमध्ये यंदा कोणतीही वाढ होणार नसून, २०२१-२२ या वर्षासाठी २०२०-२१चेच दर कायम राहणार आहेत. त्याचप्रमाणे दर वाढ न झाल्यामुळे मुद्रांक शुल्कही वाढणार नाही. ही अप्रत्यक्षरीत्या सवलतच असून, त्यामुळे बांधकाम क्षेत्राला हा मोठा दिलासा ठरणार आहे. बांधकाम क्षेत्राला या निर्णयामुळे बूस्ट मिळेल, असा विश्वास बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिली जाणारी भरघोस सवलत, विविध बँकांनी व्याजदरात केलेली मोठी कपात, त्यासोबतच राज्य सरकारने गेल्या वर्षात मुद्रांक शुल्कात दिलेली तीन टक्के सवलत यामुळे बांधकाम क्षेत्राने उभारी घेतली आहे. मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे कोरोनाच्या संकटातही नाशिक जिल्ह्यात तब्बल एक लाख ३७ हजार मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविण्यात आले. बांधकाम क्षेत्रात निर्माण झालेली ही तेजी अशीच टिकून राहावी यासाठी तसेच गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांसोबतच ग्राहकांनाही काही प्रमाणात दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आणि गृहनिर्माण उद्योगाला बूस्ट देण्यासाठी सरकारने गतवर्षीप्रमाणेच दर स्थिर ठेवले आहेत.

इन्फो-

दर कमी होणे आवश्यक

वाजवी दरातील घरांचे धोरण सरकारला यशस्वी करायचे असेल तर रेडिरेकनरचे दर कमी होणे आवश्यक आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रेडिरेकनरसंदर्भातील अधिसूचनेत रेडिरेकनरच्या दरात दरवर्षी 'वाढ' होईल, असा शब्दप्रयोग आहे. त्याऐवजी 'वाढ आणि घटही होऊ शकते', असा बदल करणे आवश्यक आहे, असे मतही हे बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कोट-

रेडिरेकनरचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, नाशिकमधील काही भाग असा आहे, ज्या ठिकाणच्या दरांमध्ये दुरुस्ती करणे अथवा दर कमी करणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे मुद्रांक शुल्कातील सवलतीची मुदतही वाढवून मिळण्याची अपेक्षा होती, त्यामुळे सरकारे किमान ६ महिने ही मुदत वाढवून द्यावी, अशी बांधकाम क्षेत्राची अपेक्षा आहे.

- अभय तातेड , अध्यक्ष, नरेडको नाशिक.

कोट -

मुद्रांक शुल्क सवलतीमुळे कोरोना काळातही बांधकाम व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ग्राहकांचा प्रतिसादही कमी होऊ लागल्याने या व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी क्रेडाईने सरकारकडे दर स्थिर ठेवण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, सरकारने दर स्थिर ठेवल्याने क्रेडाईतर्फे या निर्णयाचे स्वागत आहे. दरवाढ न झाल्यामुळे ग्राहकांनाही आहे त्या दरात घर मिळणार असून, बांधकाम व्यवसायालाही याचा निश्चितच फायदा होईल.

- रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

कोट-

रेडिरेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला निश्चितच बूस्ट मिळणार असून, ग्राहकांनाही स्वस्त घरांचे पर्याय उपलब्ध होणार असल्याने घर खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढण्यास मदत होईल. त्यामुळे रेडिरेकनरच्या दरांबाबत कोणतेही बदल न करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय सागतार्ह आहे.

-निखिल रुग्टा, संचालक, रुग्टा ग्रुप

कोट -

रेडिरेकनच्या दरात होणारी १० ते १५ टक्के वाढ यावर्षी होणार नाही. त्यामुळे मुद्रांक शुल्क एक टक्क्यापर्यंत कमी भरावे लागणार असून, महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास आणखी एक टक्का सवलत मिळणार आहे. त्यामुळे यापूर्वी ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात मिळणारी दोन टक्के सवलत यापुढेही अप्रत्यक्षरीत्या मिळणार असल्याने बांधकाम व्यवसायासाठी हा चांगला निर्णय आहे.

- नरेश कारडा, चेअरमन कारडा कंस्ट्रक्शन

Web Title: Boost the construction sector as Redireckner remains stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.