थंडीत कुडकुडणाऱ्या जिवांना ‘ऊब’!
By Admin | Published: December 31, 2015 10:48 PM2015-12-31T22:48:22+5:302015-12-31T22:50:59+5:30
मनमाड : रेल्वेस्थानक परिसरात लायन्स प्राइडचा उपक्रम
मनमाड : सध्या कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला असून, या जीवघेण्या थंडीमध्ये रेल्वे फलाट हेच घर असलेल्या बेवारस जिवांना मनमाड लायन्स प्राइडच्या पुढाकाराने ऊब मिळाली आहे. रेल्वेस्थानकावरील फलाट, बसस्थानक आदि भागात थंडीत कुडकुडणाऱ्या बेवारसांना मध्यरात्री क्लबच्या वतीने ब्लॅँकेट वाटप करण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून सर्वत्र कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. चार भिंतीच्या आडसुद्धा थंडी सहन करणे अवघड झालेले असताना, रेल्वेस्थानकावर आश्रयाला असलेली ही मंडळी मात्र उघड्यावरच कुडकुडत आहेत. काही ठिकाणी या थंडीमुळे उघड्यावर झोपलेल्या अनोळखी इसमांना प्राण गमवावा लागला आहे. त्यांचे दु:ख जाणून मनमाड लायन्स प्राइडने पुढाकार घेऊन ब्लॅँकेट वाटप करण्याचा उपक्रम राबविला.
यावेळी लायन्स प्राइडचे अध्यक्ष दीपक पारीक, आशिष भंडारी, नाविद शेख, संदेश बेदमुथा, मंगेश बाकलीवाल, हेमराज दुगड, शैलेश बाकलीवाल, मुकेश गांधी, संजय मुथा, दत्तात्रय सूर्यवंशी, डॉ. शैलेश भंडारी, निर्मल भंडारी, सपना पारीक, सोनाली बाकलीवाल, नमिता बेदमुथा, हीना गांधी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)