बोरवड गावच्या तरूण सरपंच सोनाली यांचे अचूक ‘जल व्यवस्थापन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:07 PM2019-02-28T17:07:29+5:302019-02-28T17:10:42+5:30
बोरवड या गावात ग्रामविकासाचा प्रयत्न आपल्या तरूण कल्पनांद्वारे करणा-या सोनाली यांनी गावात अचूक व उत्तम जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी पाच कुपनलिकांद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी गावाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरूण तडफदार बोरवड गावच्या सरपंच सोनाली कामडी यांना ‘जल व्यवस्थापन’ या गटात पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.
पेठ तालुका पर्जन्यमानाच्या दृष्टीने चांगला असला तरी ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ याबाबत सिंचनाची कुठलीही कामे या तालुक्यात फारशी झाली नसल्यामुळे पावसाळ्यानंतर फेब्रुवारीपासूनच तालुक्यातील आदिवाी गाव-पाड्यांवर दुष्काळाची झळ बसण्यास सुरूवात होते. एप्रिल-मे या दोन महिन्यांत अक्षरश: टॅँकरवर तहान भागवावी लागते. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याचे मोल चांगलेच जाणले आहे.
त्यापैकीच एक असलेल्या बोरवड या गावात ग्रामविकासाचा प्रयत्न आपल्या तरूण कल्पनांद्वारे करणा-या सोनाली यांनी गावात अचूक व उत्तम जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी पाच कुपनलिकांद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. १७४ कुटुंबांना घरपोहच नळांद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा देत महिला मुलांची होणारी पायपीट थांबविली. १००टक्के पाणीपट्टीची वसुली करून ग्रामपंचायतीचे नुकसान टाळले. पशुधनासाठी गावाच्या चौहोबाजूंना हाळ खोदला. श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवून भुजल पातळी वाढविण्यावर भर दिला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले