बॉशच्या दोघा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:51 AM2018-08-09T11:51:38+5:302018-08-09T11:53:40+5:30
बॉश व्यवस्थापनाला सर्वोत्तम व्यवस्थापनाचा पुरस्कार घोषित
नाशिक/सातपूर : देशपातळीवरील आॅल इंडिया स्किल कॉम्पिटिशन स्पर्धेत नाशिकच्या बॉश प्रशिक्षण केंद्रातील दोघा विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत रोख पन्नास हजार रुपये आणि सुवर्णपदक पटकावले आहे, तर बॉश व्यवस्थापनाला सर्वोत्तम व्यवस्थापनाचा पुरस्कार घोषित झाला आहे.
भारत सरकारच्या वतीने दरवर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी विभागीय आणि देशपातळीवर आॅल इंडिया स्किल कॉम्पिटिशन घेतली जाते. सायन मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत बॉश प्रशिक्षण केंद्रातील मंदार ज्ञानेश्वर धात्रक (मशिनिस्ट) आणि वैभव अशोक नवाळे या दोघा विद्यार्थ्यांनी रजतपदक पटकावले होते. त्यांची निवड देशपातळीवरील स्पर्धेसाठी झाली होती. कलकत्ता येथे जूनमध्ये झालेल्या आॅल इंडिया स्किल कॉम्पिटिशनमध्ये मंदार धात्रक या विद्यार्थ्याने तर मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत वैभव नवाळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांना भारत सरकारच्या वतीने ५० हजार रुपये आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. तर बॉश कारखान्याला राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्तम व्यवस्थापनाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शिवसिंग नेगी, विक्रम गुलेरिया, अनंत दांडेकर, प्रफुल्ल टोके यांचे मार्गदर्शन लाभले.