जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:46 PM2020-04-10T18:46:55+5:302020-04-10T18:47:57+5:30
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान शुक्र वारी (दि. १०) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारासद संगमनेरहून सिन्नरच्या ...
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान शुक्र वारी (दि. १०) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारासद संगमनेरहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून अठरा जनावरांची निर्दयतेने होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली. या कारवाईत १४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुध्द वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सरहद्दीवर तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले आहेत. पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथील तपासणी नाक्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या सूचनेवरून जनावरांची अवैध वाहतूक करणाºया वाहनाचा शोध घेण्यात येत होता. पोलीस उपनिरीक्षक अजय ढाकणे, एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच महामार्ग सुरक्षा पथकाच्या कर्मचाऱ्यांना एमएच ०४ जेयु ७०५६ या अशोक लेलँड ट्रक मध्ये म्हैस रेडे व म्हशीच्या पिल्लांची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.
संबंधित वाहन चालक साकिब अब्दुल गफुर मोमिन (२७) व जुबेर इस्माईल बादशाह शेख (२३) राहणार भिवंडी, जि. ठाणे यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. यानंतर वाहन तपासणी केली असता चार म्हशी, चार रेडे, एक ते दीड वर्ष वयोगटातील म्हशीची अठरा पिल्ले निर्दयपणे ट्रकमधून वाहून नेत असल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल पवार यांनी सदर दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना विनापरवाना, बेकायदा जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.