निवडणूक आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत दोघे उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:01 PM2017-12-02T15:01:01+5:302017-12-02T15:02:41+5:30
नाशिक : भारतीय लोकशाही व निवडणूक पद्धतीबाबत शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेत नाशिक जिल्ह्यातील दोघे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आगामी काळात या दोघा विद्यार्थ्यांची निवडणूक जनजागृती मोहिमेसाठी ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ म्हणून नेमणूक केली जाणार आहे. नव मतदारांमध्ये लोकशाही मुल्ये व गुप्त मतदान पद्धतीची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.
आदित्य दत्तात्रय बैरागी (वैनतेय विद्यालय, निफाड) व वडजे प्रदीप पुंडलिक (बी. के. कावळे विद्यालय, राजाराम नगर ता. दिंडोरी) असे या दोघा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे असून, ते अनुक्रमे दहावी व अकरावीत शिक्षण घेत आहेत. भारत निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही व्यवस्था व तिच्यासाठी पुरक ठरणाºया मतदान पद्धतीविषयी शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने देशपातळीवर इयत्ता ७ वी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान चाचणी परिक्षा घेण्याचे जाहीर केले होते. विशेष करून मतदान पद्धती, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीचा काळ, मतदानासाठी पात्र ठरणारी व्यक्ती, उमेदवारासाठी पात्र ठरणारी व्यक्ती, संसदेची सदस्य संख्या, विधानसभेचा कालावधी अशा विविध प्रकारचे सुमारे ३९ प्रश्न त्यासाठी बहुपर्यायी तयार करण्यात आले होते. या परिक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात या स्पर्धा परिक्षेची पहिली फेरी घेतली असता त्यासाठी २९५३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यात पहिल्या तीन क्रमांकात ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या ७४ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय स्पर्धा परिक्षा २८ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे घेण्यात आली असता त्यातून आदित्य बैरागी व प्रदीप वडजे हे दोन विद्यार्थी ४८ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने ते आता राज्यस्तरीय परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेस भेट देवून निवडणूक कार्यालयात चालणाºया कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ व तहसिलदार गणेश राठोड यांनी त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.