घोरवड घाटात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 09:21 PM2021-12-29T21:21:09+5:302021-12-29T21:21:58+5:30
सिन्नर : सिन्नर -घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी मध्यरात्री कारचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी मध्यरात्री कारचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घोरवड घाटाच्या सुरुवातीस वळणावर आशीर्वाद लॉन्सजवळ सदर अपघात झाला.
सिन्नर येथील त्र्यंबक नामदेव वाघ, देवीदास पोपट ढोके, सोनू परमार, व इतर दोघेजण (रा. सर्व सिन्नर) हे कारने कामानिमित्त कल्याण येथे गेले होते. काम आटोपून ते सिन्नरला येत होते. सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटाच्या सुरुवातीला असलेल्या आशीर्वाद लॉन्स समोरील वळणावर कार आली असता अचानक समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने कारला हुल दिला. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळेस उलटली व टेकाडावर जाऊन आदळली. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारमधील त्र्यंबक वाघ व देवीदास ढोके (३५) यांच्या डोक्याला व शरीराला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सोनू परमार यास गंभीर दुखापत झाली. तसेच यांच्यासोबत असलेल्या दोघांनाही मार लागलेला असल्याने स्थानिकांनी मदत करत रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले, तर इतर दोघांवर सिन्नर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनायक आहेर हे करत आहेत.
सिन्नर-घोटी महामार्गावर अपघातात ठार झालेले देवीदास ढोके व त्र्यंबक वाघ.