व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:31 AM2019-01-17T00:31:22+5:302019-01-17T00:32:25+5:30
नाशिक : इंदिरानगर परिसरातील व्यावसायिकाची जबरी लूट करून सहा लाखांची रोकड लंपास करत हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना घडली ...
नाशिक : इंदिरानगर परिसरातील व्यावसायिकाची जबरी लूट करून सहा लाखांची रोकड लंपास करत हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना घडली होती. फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. यात दोघांना अटक करण्यात आली आहे. सूत्रधारासह त्याचे दोघे साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
बापू बंगला परिसरात असलेल्या ‘सुपर ग्राहक बाजार’चे संचालक अविनाश महादू शिंदे (३५) यांच्यावर गेल्या मंगळवारी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर दोघा हल्लेखोरांनी शस्त्राने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या ताब्यातील सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता. अत्यंत निर्दयी व निर्घृणपणे हल्लेखोरांनी शिंदे यांचा खून क रून सहा लाखांची रोकड लांबविल्याने संताप व्यक्त केला जात होतो. पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून तपासाला गती दिली. पोलिसांनी चिमा नाना पवार (रा. फुलेनगर, पंचवटी), सुनील रामचंद्र पवार (फुलेनगर, पंचवटी) या दोघांचा हल्ल्यात समावेश असल्याची खात्री गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला पटली. पथकाने सलग तीन दिवस या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी व सापळे रचले.
पेठरोडवरील सापळा यशस्वीपेठरोडवरील पाटालगत लावलेल्या सापळ्यात चिमा व सुनील अडकले आणि पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून व्यावसायिक शिंदे यांच्याकडील रोकड लांबविण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला चढविल्याची कबुली दिल्याची माहिती उपआयुक्त विजय मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यात दोन दुचाकींचा वापर संशयितांकडून करण्यात आला असून, पोलिसांनी एक दुचाकी (एमएच १७, बीके २२१०) जप्त केली आहे.