दारणा नदीत दोघांचा बुडून मृत्यू
By Admin | Published: May 16, 2016 12:15 AM2016-05-16T00:15:55+5:302016-05-16T00:37:44+5:30
दारणा नदीत दोघांचा बुडून मृत्यू
नाशिक : वंजारवाडी स्मशानभूमीजवळील दारणा नदीपात्रात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास घडली़ या घटनेत मृत पावलेल्या मुलांची नावे ईश्वर बाळासाहेब शिंदे (११) व समाधान प्रकाश शिंदे (१०) असे असून ते वंजारवाडीतील रहिवासी व चुलतभाऊ आहेत़
देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ईश्वर व समाधान हे दोघे चुलतभाऊ म्हशींना पाणी पाजण्यासाठी दारणा नदीपात्रात घेऊन गेले होते़ म्हशी पाण्यात उतरल्यानंतर हे दोघेही अंघोळीसाठी पाण्यात उतरले़ मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले़ हे दोघे बुडत असल्याचे जवळच असलेल्या गोकुळ बाळू भोसले यांच्या लक्षात आले़ त्यांनी या दोघांना वाचविण्यासाठी धावही घेतली, मात्र तोपर्यंत हे दोघेही पाण्यात बुडाले होते़
भोसले यांनी आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. देवळाली कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती दिली़ यानंतर या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले़ मयत ईश्वर शिंदे हा पाचवी, तर समाधान हा चौथी पास झाला होता़ हे दोघे कुटुंबात एकुलते एक आहे. यापैकी एकाला तीन तर दुसऱ्याला दोन बहिणी आहेत़ या दोघांच्या मृत्यूमुळे शिंदे कुटुंबीयांचा भविष्यातील आधारच नाहीसा झाला आहे़ या घटनेमुळे वंजारवाडी परिसरावर शोककळा पसरली असून, पुढील तपास पोलीस हवालदार व्ही़ जे़ जगदाळे करीत आहेत़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)