ठक्कर बाजारसमोर दोघांना बेदम मारहाण

By Admin | Published: June 6, 2015 12:27 AM2015-06-06T00:27:48+5:302015-06-06T00:28:15+5:30

टोळक्याची दबंगगिरी : धाडसी महिलेने केली सुटका

Both of them were beaten to death in Thakkar Bazar | ठक्कर बाजारसमोर दोघांना बेदम मारहाण

ठक्कर बाजारसमोर दोघांना बेदम मारहाण

googlenewsNext

नाशिक : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठक्कर बाजारसमोरील एका हॉटेलसमोर दुचाकीचा धक्का लागल्याची कुरापत काढून १५ ते २० जणांच्या टोळक्याने दोघा युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
टोळक्याने हल्ला केल्याने एका युवकाने भीतीपोटी पलायन केले, तर टोळीतील काहींनी दुसऱ्या एका युवकाचा पाठलाग करून त्याला पकडून आणले. त्याची बॅग हिसकावून घेत हॉटेलसमोरच बेदम मारहाण केली. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता त्या युवकाला पकडून थेट हॉटेल परिसरात असलेल्या एका खोलीत काही काळ डांबून ठेवले. किरकोळ कारणावरून युवकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत असल्याचा प्रकार हॉटेलसमोर उभे असलेले अनेकजण उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्यातील काही नागरिकांनी धाडस दाखवून धाव घेत वाद मिटविण्याचा प्रयत्नही केला; परंतु हिंदी भाषेत बोलणाऱ्या टोळीने त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने त्या टोळक्यापुढे सर्वांनाच नमते घ्यावे लागले.
अखेर त्या हॉटेलबाहेरच उभ्या असलेल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने तसेच एका महिलेने धाडस दाखवून त्या खोलीकडे धाव घेत टोळक्याने डांबून ठेवलेल्या तरुणाची सुटका केली. सदर घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली; मात्र तोपावेतो टोळक्यातले तरुण व ज्या दोघा युवकांना मारहाण झाली ते निघून गेले होते.
शहरातील मध्यवर्ती भागातील नावाजलेल्या हॉटेलसमोरून दोघे युवक दुचाकीवरून जात असताना एका दुसऱ्या दुचाकीला धडक लागली. या कारणावरून कुरापत काढून त्या दोघा युवकांना रस्त्यात अडवून टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त करून किरकोळ कारणावरून युवकांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them were beaten to death in Thakkar Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.