मंत्रिपदाच्या शर्यतीत उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही महिला डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:17+5:302021-07-07T04:18:17+5:30
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, अल्पकाळातच त्यांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवरील ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, अल्पकाळातच त्यांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत भाग घेऊन पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय मतदारसंघातील प्रश्नांसोबतच राज्यस्तरीय विषय त्यांनी संसदेत हाताळले आहेत. व्यवसायाने डॉक्टर तसेच आदिवासी असल्याने त्यांच्या मंत्रिपदामुळे आदिवासी समाजात चांगला संदेश जाण्याची पक्षाला अपेक्षा आहे. स्वत: भारती पवार यांनी आपण आहोत तेथेच समाधानी असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले असले तरी, गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीवारी करून पक्षश्रेेष्ठींच्या गाठीभेठी घेतल्या आहेत. सोमवारी बंगळुरू व मंगळवारी मुंबईत पवार यांनी भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्याचे वृत्त आहे. भारती पवार यांच्याबरोबरच नंदुरबारच्या डॉ. हिना गावित यांचेही नाव चर्चेत असून, हिना गावित या दुसऱ्यांदा खासदार झाल्या असून, संसदेच्या कामांचा त्यांना अनुभव आहे. व्यवसायाने वकील तसेच राजकीय वारस असल्याने गावित यांच्याही नावाचीही चर्चा होत आहे. गावित यादेखील आदिवासी असल्यामुळे नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात पक्ष संघटनेसाठी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग होऊ शकतो असा पक्षाचा अंदाज आहे.
चौकट===
दिल्लीच्या फोनची प्रतीक्षा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी मंगळवारी जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कोणाला बोलवितात यासाठी उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदारांना दिल्लीच्या फोनची प्रतीक्षा लागून होती. एवढेच नव्हे तर काहींना एकमेकांना दूरध्वनी करून ‘बोलावणे आले का’ अशी विचारणाही केली.