पाण्याच्या बाटल्यांपासून साकारले विद्यार्थ्यांनी अनोखे आकाशकंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:49 PM2019-10-18T23:49:38+5:302019-10-18T23:50:57+5:30
वनसगांव : दिवाळीचे वेध लागताच आठवण येते ती आकाशकंदीलाची. परंतु बाजारातील विकत घेतलेल्या आकाशकंदीलांपेक्षा स्वत: तयार केलेल्या आकाशकंदीलाची मौज काही वेगळीच असते. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे जिल्हा परिषद शाळा रायतेवस्ती येथे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षक गोरख देवढे यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून घरच्या घरी आकर्षक आकाशकंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वह्यांचे पुठ्ठे, रिकामे खोके, जुने रंगीत कापड, वर्तमानपत्रातील रंगीत कागद, फुगे यांचा वापर करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करत कमी खर्चात व कमी वेळेत आकाशकंदील तयार करण्यात चिमुकले दंग झाले. त्यानंतर
यंदाच्या दिवाळीत स्वत: तयार केलेला आकाशकंदील घरी लावण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देऊन स्वनिर्मितीचा आनंद देत टाकाऊतून टिकाऊ आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप व पालकांनी कौतुक केले. कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्र्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी साजरी करणार प्रदुषणमुक्त दिवाळी..
यावेळी शाळेतील शिक्षक शशिकांत पाटील यांनी फटाक्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पर्यावरण प्रदूषण याची विद्यार्थ्यांना माहिती देऊन यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. त्याला विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.