विहिरीने गाठला तळ
By Admin | Published: May 28, 2016 11:32 PM2016-05-28T23:32:01+5:302016-05-29T00:29:37+5:30
जोरण : भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला असून, ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. परंतु हंडाभर पाण्यासाठी दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. गत महिन्यापासून पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे पिण्याचे पाणी येत नसल्याच्या अनेकदा तक्र ारी केल्या; मात्र निष्पन्न काहीच झाले नाही. पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील सरपंच, ग्रामसेवक, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नी काहीच केले नाही. दिवसेंदिवस पाणीप्रश्न गंभीर होत असून, याकडे मात्र सरपंच व ग्रामसेवक कुठलीही दखल घेत नसून जोरण ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जोरण ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यादिवशी ग्रामस्थांनी पाणीप्रश्न मांडला. अनेकवेळा तक्र ारही केल्या मात्र ग्रामपंचायतीतला विषय तेथेच राहतो. अजून काही पर्याय शोधला नसून येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्याचा गंभीर प्रश्न पडला आहे. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, एकीकडे पाणीटंचाई घोटभर पाण्यासाठी व दुसरी कडे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भीषण पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे व तसेच मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत व गावाचा पिण्याच्या पाणीप्रश्न मार्गी लागणार की नाही, हा प्रश्न जोरण येथील ग्रामस्थांना सतावत आहे.ग्रामपंचायतीने या प्रश्नी काणाडोळा केला असून, जोरण गावावर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी. येथील ज्येष्ठ समाजसेवक बाबूराव महाराज यांनी उपोषणाचा इशार दिला आहे. (वार्ताहर)