गुजरात राज्यासह सात जिल्ह्यांच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 AM2021-04-24T04:15:17+5:302021-04-24T04:15:17+5:30

नाशिक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच ...

Boundaries of seven districts including Gujarat closed | गुजरात राज्यासह सात जिल्ह्यांच्या सीमा बंद

गुजरात राज्यासह सात जिल्ह्यांच्या सीमा बंद

googlenewsNext

नाशिक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच जिल्हा बंदीचे आदेशही लागू केले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेसह ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमा भागातील रस्त्यांवर एकून २६ तपासणी नाके लावण्यात आले आहेत. याठिकाणी कसून तपासणी केल्याशिवाय कोणालाही नाशिक जिल्ह्यात प्रवेश दिला जात नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या सात जिल्ह्यांच्या व एका राज्याची सीमा बंद करण्यात आली असून, सीमा भागात ग्रामीण पोलिसांची पथके खडा पहारा देत आहेत. यात अहमदनगर जिल्ह्याची येवला व सिन्नरमधील नांदुरशिंगोटे, वावी परीसरातील सीमा बंद करण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेली येवला, आंदरसूल भागातील सीमाही बंद करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातून नाशिकमध्ये येणारा मार्ग मालेगावातील झोडगे येथे बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगावचा सीमामार्ग नांदगाव, चाळीसगाव भागात बंद करण्यात आला असून, नंदूरबारमधून येणारा रस्ता सटाण्यातील ताराहाबाद सीमेवर अडवण्यात आला आहेे. त्र्यंबकेश्वरला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याची सीमा आंबोली घाटात बंद करण्यात आली आहे तर इगतपुरीला लागून असलेल्या घाटनदेवी भागात नाकाबंदी करून मुंबई, कल्याण व ठाणे जिल्ह्यातून येणारी वाहने अडवली जात आहेत. या सातही जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून, अत्यावश्यक कारणांची पडताळणी करूनच वाहनांना जिल्हा प्रवेशाची परवानगी दिली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

इन्फो-

गुजरातच्या सीमाही बंद

नाशिक जिल्ह्याला लागून गुजरात राज्याची सीमा आहे. या सीमेलगतच्या भागात ८ तपासणी नोक लावण्यात आले असून, आंतरजिल्हा मार्गांवर १८ तपासणी नाक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या तपासणी नाक्यांवर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यात जवळपास दोन हजार ग्रामीण पोलिसांसह एक हजार होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एक कंपनीचा समावेश आहे.

कोट-

शासनाने अत्यावश्यक व इतर महत्त्वाच्या कारणांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं अपलोड करून ऑनलाईन परवानगी मि‌ळवून अत्यावश्यक कारणांसाठी नागरिक प्रवास करू शकतील. परंतु, अतिमहत्त्वाच्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

Web Title: Boundaries of seven districts including Gujarat closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.